डॉ. जोंधळे यांच्या शैक्षणिक व युवक सक्षमीकरण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षणतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ते, नेतृत्व मार्गदर्शक व लेखक सर डॉ.नागेश जोंधळे यांना ‘शिक्षणातील सामाजिक प्रभाव’ या श्रेणीत ‘राष्ट्रीय शिक्षा रत्न सन्मान-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया ई-मॅगझिनच्या वतीने हा सन्मान देण्यात आला.
सर डॉ.जोंधळे यांनी मागील २४ वर्षांहून अधिक काळ विद्यार्थी, युवक व व्यावसायिकांना शिक्षण, करिअर मार्गदर्शन, नेतृत्व, संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत १,२५० हून अधिक व्यावसायिक प्रशिक्षण बॅचेस आणि १,५५० हून अधिक परिसंवाद, कार्यशाळा व वेबिनार आयोजित केले असून, २० हजारांहून अधिक विद्यार्थी व व्यावसायिकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव ५ लाखांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी, २००२ मध्ये, आयकॉनिक आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरूवात केली. कोविड काळात त्यांनी १०० हून अधिक विनामूल्य आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करून विविध देशांतील तज्ज्ञांना विद्यार्थ्यांशी व व्यावसायिकांशी जोडले. शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत कळसूबाई शिखरावर ७७ फूट लांबीचा भारतीय तिरंगा फडकाविणे, संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन यांसारखे उपक्रमही त्यांनी राबविले आहेत. तसेच त्यांनी सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुस्तके लिहिली असून, शिक्षण, नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकासावर विपुल लेखन केले आहे. शिक्षण, युवक सक्षमीकरण व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘टु एम्पॉवर युथ टु बिल्ड अ पावरफुल नेशन’ म्हणजे ‘युवकांना सक्षम करून शक्तिशाली राष्ट्र निर्माण करणे’ हे त्यांचे मार्गदर्शक ध्येय आहे. राष्ट्रीय शिक्षा रत्न सन्मान हा त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि युवक सक्षमीकरणाच्या सातत्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावरील गौरवपूर्ण दखल ठरला आहे. सर डॉ.नागेश जोंधळे यांना ‘राष्ट्रीय शिक्षा रत्न सन्मान-२०२६’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे समाजाच्या विविध क्षेत्रातून स्वागत होत आहे.
====================
