अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील आशादत्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाईच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जनावरांसाठी पाणी पिण्याचे ११ हौद वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
उन्हाळ्यात तसेच पाणीटंचाईच्या काळात मुक्या जनावरांची होणारी पाण्यासाठीची भटकंती लक्षात घेऊन त्यांना सहजपणे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते योगेशअप्पा पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता येथील आशादत्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाईच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जनावरांसाठी पाणी पिण्याचे ११ हौद वाटप करण्यात आले. एकूणच काय तर वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी ठरत आहे. आशादत्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही काळापासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजू नागरिकांना मदत व सहकार्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ते सहकार्य, वृक्षारोपण, गुरांचे लसीकरण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधितांना मदत अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. विविध मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्तही संस्थेच्या माध्यमातून विधायक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांनी दिली. वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा व्हावा या भावनेतून राबविण्यात आलेला जनावरांसाठी पाण्याचे हौद वाटपाचा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला आहे. मुक्या जीवांप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. या उपक्रमावेळी आशादत्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते योगेशअप्पा पोखरकर, दीपक लामतुरे, बालाजी रूद्राक्ष, आदित्य देशमुख, तिरूपती राठोड, कृष्णा नरसिंगे, परमेश्वर खाडप आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
====================
