
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यात विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेली नागरिकांची अडवणूक तात्काळ थांबवा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना सोमवार, दिनांक ७ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई तालुका हा सुसंस्कृत तालुका असून हे शिक्षणाचे माहेरघर असल्याचे सर्वत्र बोलले जाते. आसपासच्या तालुक्यातील पाल्य व पालक येथे शिक्षणासाठी राहतात. अंबाजोगाई तालुक्यातील प्रशासकीय अप्रशासकीय कार्यालय सर्व शहरात आहेत. उपजिल्हाधिकारी, पंचायत समिती, तहसील, नगरपरिषद व इतर यापैकी काही कार्यालयामध्ये नागरिकांकडून पैसे घेऊन ही वेळेवर काम होत नाही. ग्रामीण व शहरी भागातला कोणत्या कार्यालयात एकदा गेला आणि काम झाले असे कधी होत नाही. सर्व प्रशासकीय व प्रशासकीय खात्यातील कर्मचाऱ्यांवर आपण अंकुश ठेवावा. तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालयात काही तुरळक कर्मचारी कार्यालयीन कामात दिरंगाई दिसते. नको तिथे शुल्लक कामालाही खूप वेळ लावतात. तहसील या ठिकाणी तर ग्रामीण भागातील लोकांची मोठी हेळसांड होताना दिसते. कर्मचारी हे फोन न उचलणे, उचलला तर कामाचे काय झाले याबाबत व्यवस्थित न सांगणे हे आता थांबले पाहिजे, शासकीय अधिकारी हे जनतेचे नौकर आहेत. कोणत्याही नागरिकांचा फोन उचलणे व काम करणे ही जबाबदारी आहे, असे असताना ही या कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही असे दिसत आहे. प्रत्येक नागरिक तहसीलदार, सी.ओ, यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या आधी आपणास निवेदनाद्वारे कळवले होते. ५०० रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) पेपर हा ५५०/५३० रूपयाला दिला जातो. यात नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे. आजही हीच परिस्थिती आहे. यात बदल कधी होणार. शेजारील जिल्ह्यामध्ये १०० रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) आज ही शासकीय कामकाजासाठी वापरणे सुरू आहे. फक्त आपल्या अंबाजोगाईत १०० रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) मिळत नाही, शासकीय कार्यालयात चालत नाही. तरी १०० रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) शासकीय कार्यालयात वापरणे सुरूच ठेवण्यात यावे कारण, शैक्षणिक कार्यालयीन कामासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत आपण वरिष्ठांना बोलावे ही विनंती आहे. तसेच ‘मी माझ्या पगारात अत्यंत समाधानी आहे.’ या आशयाचा फलक (बोर्ड) प्रत्येक शासकीय व शासकीय कार्यालयातील विभागात लागण्याची आज गरज दिसते. येत्या आठ दिवसांत आपण ते लावावेत. आपल्याला शक्य नसेल तर आमच्या संघटनेला फलक (बोर्ड) लावण्याची परवानगी द्यावी आम्ही स्वखर्चाने लावून देवूत. तरी मे साहेबांनी या प्रकरणी लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात ही नम्र विनंती करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी १) तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अंबाजोगाई आणि २) मुख्याधिकारी साहेब, नगरपरिषद अंबाजोगाई यांना माहितीस्तव देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ऍड.अरविंद मोटेगावकर, नानासाहेब गायकवाड, लहुजी शिंदे, इम्रान पठाण, ओमराजे चव्हाण, पांडुरंग देशमुख, धनंजय सुरवसे, विजयानंद सोळुंके यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.