23/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) एकेकाळच्या दलित युवक आघाडीचे लढाऊ शिलेदार, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेतील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त प्रा.एस.के.जोगदंड यांच्या जीवनचरित्रावरील ‘सम्यक पांथस्थ आबा’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत रविवारी शहरातील विलासराव देशमुख न.प.सभागृह, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला होता.

गौरवग्रंथ प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेश खुरसाळे (माजी अध्यक्ष, योगेश्वरी शिक्षण संस्था.) हे होते. तर गौरवग्रंथाचे विमोचन ज.वि.पवार (ज्येष्ठ विचारवंत व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, मुंबई.) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक ८ जुन रोजी करण्यात आले. तसेच यावेळी गौरवग्रंथावर भाष्यकार म्हणून बोलताना प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर (छत्रपती संभाजीनगर) यांनी सांगितले की, प्रा.एस.के.जोगदंड यांच्यासारखा विद्यार्थीभिमुख प्राध्यापक आता होणे नाही. समाजासाठी आबांनी मोठा त्याग केला असे प्रा.डॉ.लुलेकर म्हणाले. तर सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई खिंवसरा (छत्रपती संभाजीनगर) यांनी आबांच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या सुविद्य पत्नी सुधाताई यांचे ही मोठे योगदान आहे असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे माजी सदस्य प्रा.पी.जी.जोगदंड (मुंबई) यांनी आपल्या भाषणात आबांचे कार्य, त्याग, समर्पण आणि जीवनमूल्ये जपत केलेला संघर्षमय प्रवास उलगडला. आबांनी अनेक विद्यार्थी घडवले. जे आज मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. चळवळ पुढे नेण्यासाठी समाजात आता दुसरे ‘आबा’ तयार झाले पाहिजेत अशी अपेक्षा प्रा.जोगदंड यांनी व्यक्त केली.

यावेळी आबांच्या सुविद्य पत्नी सुधाताई जोगदंड, पत्रकार सुरेश पाटील (छत्रपती संभाजीनगर) तसेच प्रा.एस.के.जोगदंड यांनीही आपले समायोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज.वि.पवार यांनी ‘चळवळ कशी उभी राहते, परिवर्तनाची लढाई कशी लढली जाते आणि चळवळीचे फलित कसे मिळवले जाते.’ हे जाणून घेण्यासाठी नव्या पिढीतील कार्यकर्त्यांनी ‘सम्यक पांथस्थ आबा’ हा ग्रंथ जरूर वाचावा, अभ्यासावा असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरेश खुरसाळे म्हणाले की, प्रा.एस.के.जोगदंड यांच्या सारख्या प्राध्यापक, कार्यकर्त्याची गरज काल ही होती. पण, कालच्या पेक्षा आज जास्त आहे. एकिकडे प्राध्यापक म्हणून काम करताना प्रा.जोगदंड सरांनी विद्यार्थ्यांना शिकवत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक ही केली. तसेच दुसरीकडे एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी चळवळ ही उभी केली. त्यामुळे विद्यार्थी, कार्यकर्ते आणि युवकांसाठी ‘सम्यक पांथस्थ आबा’ हा गौरवग्रंथ प्रेरक आणि दिशादर्शक ठरेल असा विश्वास डॉ.खुरसाळे यांनी व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. आयोजकांनी मान्यवरांचे स्वागत केले. बोधिघाट महिला मंडळाने ‘अतिथी हा जयभीम घ्यावा’ हे स्वागतपर गीत सादर केले.

वंचित बहुजन आघाडीकडून ज्येष्ठ विचारवंत ज.वी.पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वाल्मिक सरवदे (प्र.कुलगुरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी केले. तर सुत्रसंचालन माजी मुख्याध्यापक लंकेश वेडे यांनी करून उपस्थितांचे आभार सुखदेव भुंबे यांनी मानले. प्रा.एस.के.जोगदंड यांच्या जीवनचरित्रावरील ‘सम्यक पांथस्थ आबा’ या गौरवग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम तज्ज्ञ प्रा.जयदेव डोळे, मंगलताई खिंवसरा, ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, माजी मुख्याध्यापक लंकेश वेडे, मुक्त पत्रकार अमर हबीब, डॉ.वाल्मिक सरवदे, सुरेश पाटील, राम दोतोंडे यांनी केले आहे. तर गौरवग्रंथ समिती मध्ये ज.वि.पवार, शांताराम पंदेरे, डॉ.सुरेश खुरसाळे, डॉ.साहेबराव गाठाळ, अण्णा खंदारे, अशोक देशमुख, चंद्रशेखर बर्दापूरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव प्राचार्य डी.ए.चव्हाण, सुखदेव भुंबे, उपप्राचार्य गौतम गायकवाड, डॉ.नरेंद्र काळे, प्रा.अरूंधती पाटील, प्रा.माणिक कांबळे, रमेशभाई खंडागळे, रामभाऊ पेरकर या मान्यवरांचा समावेश होता. यावेळी सभागृहात ऍड.श्यामभाऊ तांगडे, डॉ.कमलाकर कांबळे, मनोहर सिरसाट, डॉ.मुकूंद राजपंखे, राम चव्हाण, राजेश करपे, नामदेव जोगदंड, प्रकाश सिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तर गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ.चेतन सरवदे (चेतन पब्लिकेशन्स), सुधाताई जोगदंड, उत्तम जोगदंड, ऍड.विशाल जोगदंड, समीर मोरे, प्रा.डॉ.शंकर वाघमारे, एम.वाय.काळे, संभाजीराव सोनवणे, व्यंकटराव वेडे, प्रा.संभाजीराव बनसोडे, ऍड.वसंतराव हजारे, शशिकांत सोनकांबळे, प्रा.एम.बी.चव्हाण, डॉ.किरण चक्रे, रामेश्वर खाडे, ऍड.डी.आर.गोरे, दिलीप वैद्य, संजय भोसले, ऍड.विशाल जोगदंड, कल्याण जोगदंड, ऍड.ए.एस.धाईजे, प्रसेनजीत मस्के, संदिपान पोटभरे, भगवानराव ढगे आदींसह इतरांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते. तसेच उपस्थितांनी ‘सम्यक पांथस्थ आबा’ हा गौरवग्रंथ मोठ्या प्रमाणावर खरेदी केला. मराठवाड्याच्या विविध भागांतून‌ लोक ग्रंथ प्रकाशन समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहीले होते. यावेळी आबांवरील प्रेमापोटी चाहत्यांनी कार्यक्रमासाठी सभागृहाच्या आत व बाहेर मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.