
अंबाजोगाईत आरक्षण बचाव यात्रेनिमित्त निघाली मोटार सायकल रॅली
अंबाजोगाई -: ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही. जे आहेत ते फक्त जातींचे चेहरे आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची एकजूट झाली नाही. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले.
अंबाजोगाई येथे आद्यकवी मुकुंदराज सभागृहात अॅड.प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अंबाजोगाईत पोहोंचली. यावेळी झालेल्या जाहिर सभेत अॅड.आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, अंबाजोगाई ओबीसीचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर, अॅड.अरविंद मोटेगांवकर, दिनेश परदेशी, बालासाहेब शेप, बिभिषण चाटे, विलास चाटे, राजेश पंडीत, वंचितचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्यासह मान्यवरांची मंचावर उपस्थित होती.
यावेळी बोलताना अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मिळालेले आरक्षण काढून घेतले जात आहे. मात्र याला कोणतेही राजकिय पक्ष विरोध करत नाहीत. ५५ लाख ओबीसी प्रमाणपत्र वितरीत झाले. हे चुक आहे कि बरोबर आहे हे सांगण्यास कुणी धजावत नाही. मनोज जरांगे पाटील यांना यांच्या मागणीनुसार आरक्षण द्यायचे की नाही हा राजकिय विषय आहे. मात्र हा विषय सोडविण्याकडे राजकिय पक्षांचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने ओबीसी व मराठा समाज यांना एकाच ताटात आरक्षण नको तर दोघांना वेगवेगळी ताटे द्या. अशी भूमिका आंबेडकरांनी मांडली.चटका बसता तेंव्हाच लोक जागे होतात, अशी स्थिती आता ओबीसी समाजाची झाली आहे. ओबीसी समाजाचा राजकिय चेहरा अजून जन्माला आला नाही. जे आहेत. ते त्या-त्या समाजाचे चेहरे आहेत. ओबीसींचे आरक्षण वाचवायचे असेल तर येत्या विधानसभा निवडणूकीत शंभर विधानसभेच्या जागा निवडून आल्या पाहिजे. हे लक्ष ओबीसींनी समोर ठेवले पाहिजे. यावेळी वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर, अॅड.किशोर गिरवलकर, बिभीषण चाटे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश कांबळे यांनी केले. सभेपुर्वी अंबाजोगाई शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.
७ ऑगस्ट मंडल दिवस म्हणून साजरा करा-: ७ ऑगस्ट या दिवशी तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी सामाजिक परिवर्तन करणारे मंडल कमिशन ओबीसींसाठी लागू केली. म्हणून ७ ऑगस्ट हा दिवस मंडल दिवस म्हणून देशभर साजरा करा. असे आवाहन अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.