अंबाजोगाई तालुक्यातून १० हजार बंजारा समाज बांधव सहभागी होणार
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
हैद्राबाद गॅझेटीअरनुसार आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देखील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या संवैधानिक मागणीसाठी सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा विराट मोर्चा धडकणार आहे, अंबाजोगाई तालुक्यातून १० हजार बंजारा समाज बांधव सहभागी होणार आहेत. तरी या ऐतिहासिक मोर्चात बीड जिल्ह्यातील वाडी, वस्ती व तांड्यावरील बंजारा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने सहभागी होऊन समाजाची वज्रमूठ आवळावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा अजित चव्हाण यांनी केले आहे.
अजित चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजयभाऊ राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. अजित चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की, सन १९४८ पर्यंत मराठवाडा हा निझाम स्टेट मध्ये समाविष्ट होता. तसेच सी.पी.बेरार आताचा विदर्भाचा मध्यप्रदेशात समावेश करण्यात आला होता. निझाम स्टेट व सी.पी बेरार प्रांतातील बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गाच्या सवलती मिळत होत्या. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मराठवाडा व विदर्भ हे दोन्ही प्रदेश महाराष्ट्राला जोडण्यात आल्याने आपोआपच एस.टी.प्रवर्गाच्या सवलती बंद करण्यात आल्या व त्याऐवजी विमुक्त जातीचे आरक्षण लागू करण्यात आले. यामुळे एक भाषा, समान वेशभूषा, आपसांतील रोटी बेटी व्यवहार, सण-त्यौहार, संस्कृती-परंपरा, जातपंचायत, समाजाचे धार्मिक आदर्श एकसमान असताना बंजारा समाजावर प्रचंड अन्याय झाला आहे.
हैद्राबाद गॅझेटीअरच्या धर्तीवर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण विनाविलंब देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील बंजारा समाजाने रान पेटवले आहे. सर्वत्र विविध प्रकारचे आंदोलन करून शासन प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी मागील ३०-३५ वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून राज्य सरकारकडे मागणी केली गेली आहे. परंतु, दुर्दैवाने सरकारने समाजाच्या न्यायिक व संवैधानिक मागणीला नेहमीच केराची टोपली दाखवली आहे. सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे बंजारा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालेला. आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजाच्या वतीने सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी बीड येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता जुने बीड भागातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरूवात होईल व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभेने मोर्चाचा समारोप होणार आहे. तरी बंजारा समाजातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महिला, युवक, विद्यार्थी, कर्मचारी, ऊसतोड मजूर, मुकादम, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात कार्यरत बंजारा समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून बंजारा समाजाची संघटित ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अजित चव्हाण यांनी केले आहे.
