लावणी व बॉलिवूड डान्स स्टाईल मध्ये राष्ट्रीय पातळीवर पटकावले प्रथम पारितोषिक
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीच्या २ विद्यार्थ्यांनी नुकत्याच पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. आणि नृत्य क्षेत्रात अंबाजोगाईचे नांव पुन्हा एकदा उज्ज्वल केले. राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत नवकेशरच्या श्रावणी साखरे व आर्यन नांदुरे या दोन स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश प्राप्त केले आहे. त्यामुळे नवकेशरच्या विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीचे प्रमुख भिमाशंकर शिंदे यांनी सांगितले की, नुकत्याच पुणे येथे झालेल्या व अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघ, नागपूर व मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सी.आय.डी पॅरिस, फ्रांस यांच्या वतीने ऑल इंडिया २० व्या कल्चरल नॅशनल डान्स कंटेंट्स ऍण्ड फेस्टिव्हल-२०२५ या स्पर्धेचे दिनांक २७ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात संपूर्ण देशातून लावणी डान्स स्टाईल मध्ये श्रावणी साखरे (प्रथम) आणि बॉलिवूड डान्स स्टाईल मध्ये आर्यन नांदूरे (प्रथम) क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. या राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत विविध वयोगटामध्ये नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीचे २ स्पर्धक विद्यार्थी प्रथम विजेते ठरले आहेत. यात ज्युनियर गट प्रथम – श्रावणी साखरे, मायनर गट प्रथम – आर्यन नांदूरे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी थायलंड येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी नवकेशरचे विद्यार्थी निवडले गेले आहेत. जे स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेत विजयी होतात फक्त तेच स्पर्धक विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी पात्र ठरतात. नवकेशर सेवाभावी संस्था अंतर्गत नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी ही मागील तब्बल १७ वर्षांपासून अधिक काळ संस्थेच्या अध्यक्षा सौ.आरती भिमाशंकर शिंदे (लिंबगावकर) यांच्या सातत्यपूर्ण सहकार्य व मार्गदर्शनानुसार अविरत सुरू आहे. आता पर्यंत आपल्या अकॅडमी मध्ये तब्बल २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आज पर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करीत सहभाग घेतला आहे. अखिल भारतीय सांस्कृतित संघ, पुणे आयोजित सन २०१४ साली सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत आपल्या अकॅडमीचे सहा विद्यार्थी विजेते झाले आहेत. त्यानंतर सन २०१८ साली दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अकॅडमीची विद्यार्थीनी श्रेया बजाज ही सुवर्णपदक विजेती ठरली व सन २०१९ मध्ये पुन:श्च एकदा सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अकॅडमीच्या ७ विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉंझ मेडल मिळाले. थायलंड येथील स्पर्धेत यश. तसेच काही दिवसांपूर्वी नवकेशरच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व सप्तरंग सेवाभावी संस्था, लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् , नांदेडकडून आयोजित सप्तरंग फेस्टिव्हल – २०२५ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत ५ स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश मिळविले आहे. मागील १७ वर्षांपासून आपण विद्यार्थ्यांना नृत्य व नाट्य क्षेत्रात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी अल्बम, राज्य नाट्य स्पर्धा, शॉर्ट फिल्म अशा वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळवून दिली जाते. आपल्या अकॅडमी मध्ये वय वर्षे ४ पासून पुढील सर्वच वयोगटातील विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. नृत्य शिकल्यामुळे चित्रपट क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात, मराठी अल्बम अशा विविध क्षेत्रांत अनेक संधी आता सहज उपलब्ध होत आहेत. तसे पहायला गेले. तर नृत्य व त्याचे खूप सारे फायदे आहेत, नृत्यामुळे शारीरिक स्वास्थ सांभाळले जाते, मानसिकदृष्ट्या तणावमुक्त जीवन जगता येते. आपल्या अकॅडमी मध्ये बॉलिवूड, लावणी, वेस्टर्न, सेमी क्लासिकल, हिप हॉप, कंटेम्पररी व सर्व महाराष्ट्रीयन लोकनृत्य प्रकार ही शिकविले जातात. नवकेशर अकॅडमी सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हाच होता की, जे नृत्य विषयक शिक्षण मला अंबाजोगाईत मिळाले नाही. ते येथील विद्यार्थ्यांना सहजपणे मिळावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नृत्य क्षेत्रात आपले करियर करता यावे. अंबाजोगाई ही कलावंतांची खाण म्हणून ओळखली जाते. पण, या कलावंतांना योग्य मार्गदर्शन मिळावे व योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी या अकॅडमीची आमच्याकडून सुरूवात करण्यात आली. महिलांची सुद्धा स्वतंत्र बॅच घेतली जाते. आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये ही काम करीत आहेत. ज्यात नंदन नावंदर आणि ऋषिकेश मुंदडा यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. लवकरच आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आई योगेश्वरी देवीची महिमा सांगणारे मराठी अल्बम व शॉर्ट फिल्मची निर्मिती करणार आहोत. अंबाजोगाई मधील नवकेशर ही पहिली वेस्टर्न डान्स अकॅडमी आहे. अकॅडमी सुरू केली तेव्हा अंबाजोगाईकरांनी आमच्यावर प्रेम व्यक्त करीत, विश्वास ठेवून भरभरून प्रतिसाद दिला. अंबाजोगाई मध्ये कलेची आणि योग्य कलावंतांची कदर करणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे मला काम करताना खूप लोकांनी मदत केली आहे. ग्रामीण भाग असल्याने अकॅडमीच्या सुरूवातीच्या काळात अनेक अडचणीं ही आल्या पण, योग्य नियोजन, साफ नितिमत्ता, माझी कलेवरील निष्ठा आणि प्रेम या गोष्टींच्या बळावर, सर्वांच्या सदिच्छा व आशिर्वाद यांच्या आधारावर आज अंबाजोगाई मध्ये तब्बल १७ वर्षांचा प्रवास आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करीत आहोत याचे आनंद व समाधान आहे. पुढील काळात ही नृत्य, सांस्कृतिक, नाट्य या क्षेत्रात अंबाजोगाईकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भागातील नवप्रतिभांना नवकेशरच्या माध्यमातून एक दर्जेदार व सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आश्वासक मनोदय नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीचे प्रमुख भिमाशंकर शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
=======================
