शिवकुमार निर्मळे, गणेश तौर, हनुमंत घाडगे व नामदेव तोकले पुरस्काराचे मानकरी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि.३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम पब्लिक स्कूल, मोरेवाडी (अंबाजोगाई) येथे करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे (अंबाजोगाई), अष्टपैलू प्राथमिक शिक्षक गणेश तौर (अंबाजोगाई), सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रवर्तनवादी चळवळीत कार्यरत असलेले हनुमंत घाडगे (केज) व नव्या पिढीतील प्रतिभावंत प्राथमिक शिक्षक नामदेव तोकले (धारूर) यांचा पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा ही तमाम बहुजन समाजातील प्रवर्तनवादी संघटनांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याची योग्य ती दखल घेऊन मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मागील १२ वर्षांपासून सातत्याने अंबाजोगाई शहरात महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यावर्षी ही या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के (बीड) तर यावेळी विचारमंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर वराट गुरूजी, संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभाग कार्यकारिणी सदस्य प्रविण उत्तमराव ठोंबरे, मराठा सेवा संघ प्रणित न्याय कक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.प्रशांत शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी वर्ष २०२४-२०२५ साठी शिवकुमार काशिनाथ निर्मळे यांनी श्री योगेश्वरी नुतन विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात ही महत्वपुर्ण योगदान दिले आहे. तसेच ते मागील अनेक वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, पत्रकार संघ, नरहर कुरूंदकर स्मृती समारोह समिती, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोमनाथ बोरगांव केंद्र आपेगाव (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक शिक्षक गणेश काशिबाई धोंडीराम तौर (अंबाजोगाई) हे शिक्षण क्षेत्रात एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. तसेच ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक, संगीत व नाट्य क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून ही सर्वपरिचित आहेत. तर वर्ष २०२५-२०२६ साठी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (मा.वि.), केज येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रवर्तनवादी चळवळीसह साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले हनुमंत बळीराम घाडगे (केज) हे मागील अनेक वर्षांपासून शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीशी निगडित आहेत. एक अभ्यासू वक्ते, साहित्यिक म्हणून ही ते सर्वदूर ओळखले जातात. तसेच नव्या पिढीतील प्रतिभावंत, विद्यार्थीभिमुख प्राथमिक शिक्षक म्हणून नामदेव मुकुंद तोकले (धारूर) यांनी शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पुरस्कारांसाठी निवड झालेले सर्व सन्माननीय मान्यवर हे शिक्षण, साहित्य, क्रीडा, पत्रकारिता, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात ही महत्वपुर्ण योगदान देत आहेत. या चारही मान्यवरांच्या उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन समितीने सदरील पुरस्कारांसाठी त्यांची निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ असे आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड, अंबाजोगाई यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि.३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम पब्लिक स्कूल, मोरेवाडी, अंबाजोगाई येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजक संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभाग कार्यकारिणी सदस्य प्रविण उत्तमराव ठोंबरे (८९९९०६२७०७) आणि मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के (९४२२९३००१७) यांनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
=======================
