उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सीसीआय मार्फत राज्यातील हमीभाव कापूस खरेदीसाठी कापूस किसान मोबाईल ऍपवर नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी, संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना गुरूवारी बीड येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी सदरील मागणी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. याविषयी आपण स्वतः जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देवूत अशी ग्वाही आणि सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी संचालक मोदी आणि सोळंके यांना दिला.
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी, संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची गुरूवार, दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी बीड येथे प्रत्यक्ष भेट घेतली. आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करून एक निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, एम.एस.पी योजने अंतर्गत सन २०२५-२०२६ मध्ये शासकीय हमीभाव कापूस शेतकऱ्यांना सीसीआयला विकी करण्यासाठी कापूस किसान मोबाईल ऍप नोंदणी करून आपल्या स्वनोंदणी प्रमाणे स्लॉट बुक करून मिळेल. त्या तारखेस शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणण्याची तरतुद आहे. कापूस सीसीआयला विक्रीसाठी शेतकऱ्यांना कापूस किसान मोबाईल ऑपवर नोंदणी करणेसाठी अंतिम तारिख ३०/१०/२०२५ पर्यंत दिलेली होती. शेतकऱ्यांची व राज्य शासनाचे वेळोवेळी मागणीनुसार ही तारीख वाढवून दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत देण्यात आली होती. परंतु, राज्यातील अगणीत शेतकऱ्यांना मुदतीत नोंदणी ही तांत्रीक व नेटवर्कचे कारणांमुळे करता आलेली नाही. म्हणुन शेतकऱ्यांनी तसेच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य शासनाकडे सदर मुदत वाढविण्याची मागणी केली असता. सदर मुदत दिनांक १६/०१/२०२६ ही करणेत आलेली आहे. तरी परंतु, ही मुदत सुध्दा शेतकऱ्यांसाठी अपुरी आहे. कारण, कापूस किसान मोबाईल ऍपवर माहिती भरण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर करणेची मुख्य अट आहे. सामान्य शेतकऱ्यांना इंग्रजी भाषा अवगत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागात मोबाईलला म्हणावे तेवढे नेटवर्क मिळत नाही. कव्हरेज मिळत नाही. अशा अनेक अडचणी आहेत. यापुर्वी सन २०१९-२०२० मध्ये कोरोना काळात (एम.एस.पी) अंतर्गत हमी भावाने कापूस खरेदी ही दिनांक १३/०८/२०२० पर्यंत शेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा केवळ आपल्या मार्फत मिळालेला आहे. राज्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी ही कापूस किसान मोबाईल ऍपवर करणे अद्याप बाकी आहे. करिता सदरील ऍपवर कापूस विक्रीच्या नोंदीची मुदत ही दिनांक ३० एप्रील २०२६ पर्यत करणे गरजेचे असल्यामुळे तशा सुचना सीसीआय बेलापूर व मुंबईला देण्यात येणे गरजेचे आहे. तरी विनंती की, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस (एम.एस.पी) अंतर्गत सीसीआयला विक्री करण्यासाठी कापूस किसान मोबाईल ऍप नोंदणीची मुदत दिनांक ३० एप्रील २०२६ पर्यत करणे बाबतच्या सुचना सीएमडी ऑफीस बेलापूर, नवी मुंबई यांना देण्यात याव्यात अशी सविनय विनंती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी आणि संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना न्याय देणार :
सीसीआय मार्फत राज्यातील हमीभाव कापूस खरेदीसाठी कापूस किसान मोबाईल ऍपवर नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी व संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी माझ्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे. सदरील मागणी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. याविषयी आपण स्वतः जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देवूत.
~ ना.अजितदादा पवार
(उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य.)
कापूस उत्पादकांना आधाराची गरज :
अतिवृष्टीचा परिणाम, यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे आणि ओलावा जास्त असल्याने शेतकरी वेळेत कापूस विकू शकले नाहीत. म्हणून शासकीय मदत होईल या विचाराने कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हमीभावाने कापूस खरेदी करीत आहे, ज्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. याकरिता सरकारने तातडीने ही मुदत वाढ करावी.
~ राजकिशोर मोदी
(संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघ, नागपूर.)
मुदत वाढल्यास शेतकऱ्यांना फायदा :
कपास किसान ऍपमुळे शेतकरी घरबसल्या नोंदणी करू शकतात. पण, पावसामुळे उशिरा कापूस तयार झाल्याने त्यांना मुदतवाढीची गरज आहे. कापूस महामंडळाने कपास किसान ऍपद्वारे नोंदणीसाठी १६ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे आणि यावर्षी अनेक केंद्रांवर अपेक्षेपेक्षा कमी कापूस खरेदी झाला आहे. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून ही खरेदीचा कालावधी आणि नोंदणीची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी होत आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना फायदा मिळेल.
~ ऍड.विष्णुपंत सोळंके
(संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघ, नागपूर.)
=======================
