महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघाचे सचिव राम घोडके यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला अंबाजोगाईतील माळी समाज स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सर्व्हे नं.६२१ मधील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघाचे सचिव राम वसंतराव घोडके यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे बुधवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याबाबत महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघाचे सचिव राम वसंतराव घोडके यांनी बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नं.६२१ हा स्मशानभूमीच्या नांवे आहे. आमच्या माळी समाजाच्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने वेळोवेळी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपण सर्व्हे नं.६२१ मधील शिल्लक असलेल्या एकूण जमिनीपैकी १५ ते २० गुंठे जमीन माळी समाज स्मशानभूमी म्हणून ठराव घेऊन, सर्व प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयास द्यावा अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत माळी समाजाचे युवक कार्यकर्ते राम घोडके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून माळी समाज स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत माळी समाजातील मृत बांधवांचा उघड्या व अपुऱ्या जागेवर अंत्यविधी करावा लागत आहे, या बाबत माळी समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी समस्त माळी समाजाच्या वतीने आणि महात्मा ज्योतिबा फुले सेवा संघाच्या माध्यमातून बुधवार रोजी मुख्याधिकारी मॅडम, नगरपरिषद, अंबाजोगाई यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी पंकज राऊत, नितीन जिरे, शरद माळी, अशोक बलुतकर, अभिजित जिरे, बालाजी घोडके, पवन घोडके आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती अशी माहिती सचिव घोडके यांनी दिली.
=======================
