
समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये अतिवृष्टी होवून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईचे अनुदान व पीक विमा द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत गुरूवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई, केज, नेकनूर या भागात अती पाऊस होवून शेतकऱ्यांचे फार नुकसान झालेले असून शेतकरी ऑनलाईन तक्रारी करू शकत नाही. तसेच पंचनामा करण्यात वेळ जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिक विमा भरणा केलेल्या कंपनीने ऑनलाईन तक्रार बंधनकारक करू नये. गावात मंडळ अधिकारी, कृषी सेवकांनी केलेले पंचनामे गृहीत धरून सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईचे अनुदान जाहीर करावे आणि पिक वीमा कंपनीने शासकीय यंत्रणामार्फत केलेले सदरचे पंचनामे गृहीत धरून पिक विमा मंजुर करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू अझमी साहेब यांचे नेतृत्वाखाली अंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. सदरील निवेदनावर समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, राजेश परदेशी, ऍड.डी.एल.केंद्रे, शेख जिलानी शेख महेबूब आणि शेख शौकतभाई आदींसह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पंचनामे गृहीत धरून पिक विमा मंजुर करा :
शेतकरी ऑनलाईन तक्रारी करू शकत नाही. तसेच पंचनामा करण्यात वेळ जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिक विमा भरणा केलेल्या कंपनीने ऑनलाईन तक्रार बंधनकारक करू नये. गावात मंडळ अधिकारी, कृषी सेवकांनी केलेले पंचनामे गृहीत धरून सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईचे अनुदान जाहीर करावे आणि पिक विमा कंपनीने शासकीय यंत्रणांनी केलेले सदरचे पंचनामे गृहीत धरून पिक विमा मंजुर करावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.
- ऍड.शिवाजी कांबळे