17/04/2025
Spread the love

अंबाजोगाई (वार्ताहर)
संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी पेक्षा ही मोठा पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडाला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ६१ महसूल मंडळात प्रचंड वृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील ४ महसूल मंडळात १५० मि.मी. तर ३१ महसूल मंडळात १०० मि.मी. पेक्षा ही अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात २४ तासांहून अधिक काळ सलग संततधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी पेक्षा ही मोठा पाऊस झाला. अतिवृष्टीने सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, मुग, कापूस, भुईमूग, पिवळा, उडीद, कांदा, आद्रक, तीळ, सूर्यफूल या खरीप पिकांची, भाजीपाल्याची पूर्ण वाट लागली आहे. शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. असंख्य ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मनुष्यहानी झाली असल्याचे ही समजते. तेव्हा शासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना त्याची सरसकट भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी करून जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, रविवार रोजी रात्री पासूनच सुरू झालेला पाऊस हा रविवार व सोमवार असा सलग दोन दिवस कोसळला. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ६१ महसूल मंडळात प्रचंड वृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील ४ महसूल मंडळात १५० मि.मी. तर ३१ महसूल मंडळात १०० मि.मी. पेक्षा ही अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागा तसेच काढणीला आलेल्या पिकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. असंख्य शेतकर्‍यांचा ऊस शेतातच आडवा झाला आहे. या अस्मानी संकटामुळे खरिपाबरोबरच, रब्बी पीक नियोजनावर निसर्गाने पूर्णपणे वरवंटा फिरवला आहे. खरीप पिके आज पूर्णपणे पाण्यात सडून चालली आहेत. गोदाकाठ, नदी काठावरील परिसरात अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील अनेक घरांच्या पडझडी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत बीडचे जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, महसूल मंडळातील अधिकारी, कृषि विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाताळणार्‍या अधिकारी वर्गाने सदर नुकसानीची तात्काळ पाहणी करून शासनाने तातडीने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून त्याची सरसकट भरपाई तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट वर्ग करावी तसेच अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक रस्त्यांची, पुलांची वाट लागली आहे. तेव्हा शासनाने रस्ता व पुल दुरूस्तीकडेही विशेष लक्ष पुरवावे व त्यांच्या दुरूस्तीसाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असेही आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे.

=======================

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.