
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
आंतरभारती शाखा अंबाजोगाई तर्फे दिनांक 14/09/2024 शनिवार रोजी मेरी बात या उपक्रमाचा 7 वा भाग संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षक, कलावंत, पडद्यामागील कलाकार व अंतरभारती शाखा अंबाजोगाई चे सचिव वैजनाथ शिंगोळे यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास मांडला.
आपल्या जीवनातील प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की कुटुंबात अत्यंत हालाखीचे दिवस होते. प्राथमिक शिक्षण परळी-अंबाजोगाई या ठिकाणी पूर्ण झाले. प्राथमिक शिक्षण शिकताना कुटुंबाला आधार व्हावा म्हणून वेळप्रसंगी शेळ्या राखून मदत केली. सातवीला असताना नापास झाल्यामुळे शेळ्या राखणे बंद करून अभ्यासाकडे लक्ष दिले. पुढे वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषक मिळाल्यानंतर जीवनाला नवे वळण लागले. आपण काहीतरी करू शकतो ही भावना मनात निर्माण झाली. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिकवणी घेऊन कुटुंबास हातभार लावला. महाविद्यालयीन शिक्षण व बी. एड पूर्ण केले. 28/11/1996 ला शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात झाली. अंगातील विविध कलेमुळे समाजात नवी ओळख निर्माण झाली. कलेला मिळालेली दाद ही खूप आनंददायी होती. फेटा बांधणे, गीत गाणे, लेझिम वाजवणे, व सामाजिक कार्यक्रमातून पडद्यामागे केलेल्या कार्यामुळे या कलेमुळे समाजात नवी ओळख झाली. आंतरभारती परिवाराकडून खूप काही शिकण्यास मिळाले. असे मत आपले मनोगत व्यक्त करताना श्री. वैजनाथ शेंगुळे यांनी आंतरभारती च्या मेरी बात या उपक्रमात बोलताना व्यक्त केले.
हा कार्यक्रम अंबाजोगाई येथील मंगळवार पेठेतील मानवलोक च्या जनसहयोग कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला आंतरभारतीचे अध्यक्ष दत्ता वालेकर यांनी वैजनाथ शेंगुळे यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेंकटेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब, प्रा.शैलजा बरुरे, एस.बी.सय्यद, संतोष मोहिते, प्रवीण बजाज, ओमकेश दहिफळे, संतोष बोबडे, अनिता कांबळे, किरण आसरडोहकर, संजय सुराणा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.