
पाटोदा येथे शेतकऱ्यांचे निदर्शन आंदोलन
अंबाजोगाई (वार्ताहर)
सोयाबीनला १० हजार व कापसाला १५ हजार रूपये हमीभाव तसेच २०२३ चा पिक विमा द्यावा, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी या प्रमुख मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुक्यातील पाटोदा येथे मंगळवारी निदर्शन आंदोलन करण्यात आले. याप्रश्नी अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि कृषि उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले होते.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव नारायणराव मुळे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब पवार, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष सिद्राम यादव, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.अश्विनीताई यादव लोमटे, अंबाजोगाई तालुकाध्यक्षा सुनंदाताई लोखंडे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे यांनी तालुक्यातील पाटोदा येथे मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी निदर्शन आंदोलन केले. या आंदोलनास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशिद यांनी ही सहभागी होत पाठिंबा दर्शविला. सदर आंदोलनात पाटोदा व पंचक्रोशीतील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या विषयी प्रामाणिक तळमळ असणारे सामाजिक कार्यकर्ते ऍड.भैरवनाथ देशमुख, गोविंद कदम, सुभाष उगले, बाबुराव तोडकर, नामदेव नरारे, दिपक जामदार, अनिल सरवदे, अरूण पवार, हेमराज देशमुख, देवानंद पाडुळे, अंगद कांबळे, मारूती मुळे, बाळासाहेब घोरपडे, श्रीकृष्ण जामदार, बालासाहेब घोरपडे, राम गवळी, श्रीराम जामदार, चंद्रकांत सरवदे यांच्यासह शेतकरी व संभाजी ब्रिगेडच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मागण्यांचा फलक घेऊन, घोषणा देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संभाजी ब्रिगेडच्या वतीने अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि कृषि उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई यांना बुधवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सदरील निवेदनात नमूद केले आहे की, केंद्र शासनाने सन २०२४ – २०२५ या वर्षासाठी सोयाबीन पिकाला ४८९२/- रूपये व कापूस या पिकाला मध्यम स्टेपला ७१२१/- रूपये व कापूस पिकाला लांब स्टेपला ७५२१/- रूपये हमीभाव दिला आहे. म्हणून आपण ही सोयाबीन व कापूस हमीभावाने खरेदी करावे. कारण की, जे व्यापारी सोयाबीन व कापूस हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करीत आहेत. त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. आपण हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जर गुन्हे नाही दाखल केले. तर संभाजी ब्रिगेड (ता.अंबाजोगाई जि.बीड) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी नोंद घ्यावी. सर्व परवानाधारक आडते व व्यापाऱ्यांना हमीभावाचे परिपत्रक काढून कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई यांनी कळवावे. सर्व पिकांच्या हमीभावाचे परिपत्रक काढावे. असे नमूद केले आहे. निवेदनासोबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हमी भावाचे परिपत्रक ही जोडले आहे.
शेतकरी विधानसभेला मतदानातून धडा शिकविणार :
शासनाने सोयाबीन पिकाला १० हजार रूपये व कापूस पिकाला १५ हजार रूपये हमीभाव द्यावा., २०२३ चा पिक विमा द्यावा., सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. अन्यथा आगामी विधानसभेला शेतकरी मतदानातून महायुती सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. याची राज्य शासनाने नोंद घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकार, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- प्रविण ठोंबरे
(जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, बीड.)
=======================