
भिमशक्तीचे उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षकांना निवेदन
अंबाजोगाई (वार्ताहर)
राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भिमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक यांना गुरूवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत व बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी धर्मनिरपेक्ष लढणारी सामाजिक संघटना भिमशक्तीच्या वतीने उपजिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक, अंबाजोगाई यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत असताना एका विद्यार्थीनीच्या प्रश्नाचे उत्तर देताना असे वक्तव्य केले की, “भारतामध्ये जोपर्यंत जातीवाद आहे, सामाजिक असमानता आहे. तोपर्यंत आरक्षण राहणार आणि जेव्हा भारतामधून जातीवाद संपेल आणि समानता निर्माण होईल. त्यावेळेस आम्ही आरक्षण संपविण्याचा विचार करू” या वक्तव्याचा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विपर्यास करून राहुल गांधी यांच्याबद्दल असे वक्तव्य केले की, “जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला अकरा लाख रूपयांचे मी बक्षीस देणार” असे वक्तव्य केले. तसेच खा.अनिल बोंडे यांनी सुध्दा राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्य केलेले आहे. या अपशब्दावरून असे दिसून येते की, संजय गायकवाड व खा.अनिल बोंडे यांच्या मनात राहुल गांधी यांच्याबद्दल राजकीय द्वेष आहे. त्यामुळे आ.गायकवाड व खा.बोंडे यांच्या या भुमिकेचा व त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आम्ही करीत आहोत. तरी बुलढाण्याचे आ.गायकवाड व खा.बोंडे यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्यात यावा. असे नमूद केले आहे. सदरील निवेदनावर भिमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात, जिल्हा उपाध्यक्ष यशपाल बनसोडे, भाऊसाहेब निसर्गंध, धीमंत राष्ट्रपाल, संघर्ष इंगळे, साळवे, शेख अलोद्दीन, प्रेमजीत हजारे, अभय वाघमारे, रवि आवाडे, संकेत आवाडे, धीरज आवाडे, सुमीत आवाडे, निखिल भोसले, नागेश डोळसे, शिवसागर धोत्रे, कैलास मस्के, किरण घुमरे, सागर निरगुळे, राहुल जोगदंड, आदित्य चौरे, नितीन तरकसे, आदित्य मासुळे, राम मोरे, अभिनय सरवदे, सम्राट कांबळे, कैलास सरवदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
=======================