
महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या क्युअर इंडिया आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या “फूट क्लिनीक” या उपक्रमाच्या माध्यमातून 30 बालकांची दिव्यांगापासून मुक्ती करण्यात आली आहे . यामुळे ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांना याचा फायदा होत आहे.
जन्मतःच वाकडी पाय असलेल्या बालकांवर सात दिवसाच्या आत उपचार केल्यास त्यांचे पाय बरे होतात. याची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी दिल्ली येथील क्यूर इंडिया संस्था बीड जिल्ह्यात काम करत आहे. त्याच्या समन्वयक अश्विनी पांचाळ आहेत. आशा वर्कर यांच्या माध्यमातून पांचाळ जिल्ह्यातील दिव्यांग मुलं शोधून अंगणवाडीच्या माध्यमातून त्या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याचे काम करतात.
अश्या दिव्यांग बालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी 10 हजार ते 1 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो मात्र ‘फूट क्लिनिक” च्या माध्यमातून सर्व उपचार मोफत दिले जातात. आजपर्यंत भारतात दिव्यांग असलेल्या 1 लाख मुलांवर मोफत उपचार करून ते पूर्णतः बरे झाले आहेत. त्याचं अपंगत्व नष्ट झाले आहे. या बालकांना लागणारे शूज हे क्यूर इंडिया मोफत देते. तसेच डॉक्टरांना प्रशिक्षण देखील दिले जाते अशी माहिती क्यूर इंडियाच्या बीड जिल्हा समन्वयक अश्विनी पांचाळ यांनी दिली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात मार्च 2023 ला ‘फूट क्लिनिक” सुरू करण्यात आले. या ठिकाणी आठवड्यात दोन वेळा दिव्यांग असलेल्या बालकांवर उपचार करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. मागील 1 वर्षात ज्या बालकांचे पाय पूर्णपणे वाकडी होती ज्यांना भविष्यात चालणं शक्य नव्हते अश्या 51 बालकांवर उपचार सुरू असून यातील 30 बालके पुर्णतः 100% बरी झाली. आज ते आपल्या पायावरती चालत आहेत.
माझ्या लेकरावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते मात्र आशा वर्करच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्यानंतर मी क्यूर इंडिया च्या पांचाळ मॅडम यांना भेटले. त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि मी माझ्या लेकरावर स्वाराती रुग्णालयात असलेल्या ‘फूट क्लिनिक’ मध्ये उपचार केले या ठिकाणी पुर्णतः मोफत उपचार झाले,आज माझं लेकरु चालत आहे.
असं कुंबेफळ येथील लाभार्थी यांनी सांगितले आहे.
ज्या लहान मुलांना अपंगत्व येते अश्या मुलांवर फूट क्लिनिक मध्ये उपचार केले जातात यासाठी क्यूर इंडिया संस्था स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देते. रोटरी क्लब प्लास्टरचा खर्च करतो,डॉ. दीपक लामतुरे व त्यांची टीम मुलांवर उपचार करते, या बालकांना क्यूर इंडिया मोफत बूट देते, आजपर्यंत 51 बालकांवर उपचार सुरू असून यातील 30 बालके पूर्णतः बरी झालेली आहेत, अशी माहिती स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी दिली आहे.
क्लब फूट किंवा सीटीव्हीचे जे बच्चू असतात त्यांना जन्मताच पायामध्ये अपंगत्व आलेलं असत, आई वडिलांना जर अश्या पध्दतीने अपंगत्व असेल तर त्यांच्या मुलांमध्ये असं अपंगत्व येणाची दाट शक्यता असते लहान मुलं जन्मल्यानंतर सात दिवसानंतर उपचार करायला हवे,तीन महिने उशीर झाला तर असे बच्चू बरे होणार नाहीत त्यांचे पाय आहे तसेच वाकडे राहतात,लवकर उपचार केल्यास बिना ऑपरेशनचे पाय सरळ होतात यासाठी क्यूर इंडिया आम्हला मार्गदर्शन करते अशी माहिती अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक लामतुरे यांनी दिली आहे.