26/06/2025
Spread the love

उपविभागीय अधिकाऱ्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन

अंबाजोगाई (वार्ताहर)
मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवा अशी मागणी जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. याप्रश्नी लक्ष वेधून घेत उपविभागीय अधिकाऱ्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण म्हणाले आम्ही सोमवार, दिनांक 7 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने नुकतेच 2024 मध्ये 100/- रूपयाचे मुद्रांक (बॉण्ड) बंद करून 500/- रूपयांचे मुद्रांक (बॉण्ड) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर दैनंदिन जीवनामध्ये मुद्रांक (बॉण्ड) चा उपयोग हा न्यायालय, कचेरी, रजिस्ट्री ऑफिस, तहसील कार्यालय, शैक्षणिक कार्यपद्धती व वेगवेगळी शपथपत्रे तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो. आजपर्यंत 100 चा मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून हा नियमबाह्य पद्धतीने 110/- रूपयाला विकला जात आहे. आता 500/- रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) देखील 550/- रूपयाला नियमबाह्य पद्धतीने विकला जातोय, परिणामी एका मुद्रांकामागे शासन 400/- रूपये तर मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून अधिकचे 50/- रूपये असे एकूण मिळून 450/- रूपये मोजावे लागणार आहेत. हि वाढ तब्बल पाचपट आहे. मंत्रिमंडळाच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य माणसाला आर्थिक झळ स्वरूपात बसणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांची खूप मोठी आर्थिक लूट होत आहे. तरी राज्य सरकारने 100/- रूपयांचा बॉण्ड व 500/- रूपयांचा बॉण्ड यांची अधिकृत जी किंमत असेल ती जाहीर करून बॉण्ड विक्रेत्यांना शासनमान्य दरानुसारच विकण्यास बंधनकारक करावे, अन्यथा जे बॉण्ड विक्रेते शासन निर्णयांची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा बॉण्ड विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत व सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी जाचक ठरणारा हा तुघलकी निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी विनंती ही सदरील निवेदनातून करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, लहुजी शिंदे, पांडुरंग देशमुख, विजय चव्हाण, ओम चव्हाण, शेख अकबर, सुधार उफाडे, दादाहरी केकाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

=======================

नोट – बातमी सोबत फोटो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.