
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
उबाठा नेते उद्धवजी ठाकरेंनी विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर मुंबईस्थित शिवतीर्थावर मेळाव्यातून बोलताना सत्ताधार्यांनी घेतलेले सर्व निर्णय आम्ही सत्तेत आल्यानंतर रद्द करू अशा प्रकारची भीष्मप्रतिज्ञा केली. प्रश्न असा पडतो की, ठाकरे हे माता – भगिनींच्या मुळावर का उठले ? ज्यामुळे लाडकी बहिण योजना त्यांच्या डोळ्यांवर सतत खुपते. सत्ताधार्यांनी सामान्य महिलांच्या हितासाठी निर्णय घेतला असताना तो निर्णयच रद्द करण्याची भाषा म्हणजेच खर्या अर्थाने लाडक्या बहिण योजनेला मविआचा जाहिर विरोध आता लपून राहिला नसल्याची टिका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
राजकीय स्वार्थासाठी राजकारण करू पहाणारे उद्धव ठाकरे सामान्य जनतेच्या आणि महिलांच्या मुळावर का उठले?हा प्रश्न आता सामान्य लोकांना पडलेला दिसतो. विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर खरं तर चांगलं आणि सकारात्मक बोलणे हाच खरा भारतीय हिंदु संस्कृतीचा अलंकार होय. मात्र हिंदुत्व सोडून दिल्यानंतर राजकिय स्वार्थापोटी ठाकरेंची भुमिका पावलोपावली बदलताना दिसते. मविआ सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय रद्द करण्याची घोषणा ठाकरेंनी शिवतीर्थावरून केली. खरं तर लाडक्या बहिण योजनेचं सर्व स्तरातुन स्वागत होत असताना त्या योजनेला सुरूवाती पासूनच उद्धवजी ठाकरेंनी प्रचंड विरोध केला. गोरगरीब माता-भगिनींनी त्यांचं नेमकं काय बिघडवलंय ? कळायला मार्ग नाही. शिवतीर्थावरून सत्तेत येण्याची भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली असती तर तो राजकिय बाणा ओळखला जावू शकला असता. पण लाडक्या बहिण योजनेसारखे निर्णय रद्द करू सत्तेत येण्याच्या अगोदरच अशा प्रकारची धमकी ठाकरेंनी देणं यावरूनच त्यांच्या पोटात महिला वर्गाविषयी किती पाप याची प्रचिती येते ? स्व.बाळासाहेबजी ठाकरे जिवंत असते तर शिवतीर्थावरून त्यांनी लाडक्या बहिण योजनेचे जोरदार स्वागत आणि कौतुक केले असते. मात्र त्यांचे सुपुत्र योजना रद्द करण्याची भाषा करतात. बरं झालं त्यांनी जाहीर करून टाकले की, सत्तेत आल्यानंतर आम्ही पहिलं काय काम करणार ? हे सांगून टाकलं. कारण आता राज्यातील माता – भगिनी त्यांच्या भीष्म प्रतिज्ञेपासून सावध झाल्याशिवाय रहाणार नाहीत. महाविकास आघाडी 2019 ला सत्तेत आल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी सत्ताधार्यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द करून टाकले होते. उदाहरणार्थ – मराठवाडा वॉटरग्रीड योजना. तेही खरंच आहे की, आता लाडकी बहिण योजना मविआ सत्तेत आल्यानंतर रद्द करण्याची त्यांनी केलेली घोषणा खरीच करून दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत. कारण, गोरगरिब महिलांच्या विषयीही कुठलाही त्यांच्याकडे अजेंडा नाही. केवळ राजकिय मते मिळविण्यासाठी सत्ताधार्यांच्या विरोधात नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचे काम सद्यस्थितीत जोरात असल्याची टिका कुलकर्णी यांनी केली. हे खरं आहे की, त्यांच्या भीष्म प्रतिज्ञेपासून आता महिलांनी सावधान रहाण्याची गरज हे मात्र नक्की.
=======================