
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयामध्ये स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बुधवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आले आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम तरूणांच्या जीवनात घडावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान वृद्धिंगत व्हावे हा या स्पर्धेचा हेतू आहे. या दृष्टिकोनातूनच वक्तृत्व स्पर्धेच्या विषयांची निवड केली आहे. राष्ट्र, समाज आणि शिक्षण या त्रिसूत्रीला अनुसरून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.
खोलेश्वर महाविद्यालय हे मागील 53 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. चालू शैक्षणिक वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे होत आहे. या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याशी निगडित विविध उपक्रमांचे आयोजन महाविद्यालय करत आहे. हे या वक्तृत्व स्पर्धेचे 54 वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी केले आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. 1) असे आम्हाला हिंदुत्वाचा सार्थ असा अभिमान, 2) निर्भय होऊ आम्ही, जगाला निर्भयता शिकवू, 3) कुटुंब हेच संस्काराचे प्रथम केंद्र, 4) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद, 5) समाज स्वास्थ्य बिघडविणारी समाज माध्यमे..! या स्पर्धेचे माध्यम मराठी असेल. पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठवावा. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेचे सांघिक शुल्क 100 /- रूपये असेल. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संघाची नोंदणी principalkma@gmail.com या ई-मेलवर करावी. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना संलग्न असलेली वरिष्ठ महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये तसेच माध्यमिक विद्यालयांना जोडून असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धा बुधवार दि.16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात सुरू होईल. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या संघाला फिरता स्मृती चषक देण्यात येईल. हा फिरता स्मृती चषक संबंधित महाविद्यालयाकडे एक वर्ष राहील. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या समवेत आलेल्या प्राध्यापक किंवा प्रशिक्षकांची देखील भोजनाची व्यवस्था महाविद्यालयात करण्यात आलेली आहे. तसेच प्रथम पारितोषिक – रूपये 7001/- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक – रूपये 5001/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक – रूपये 3001/- व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रूपये 1101/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी स्पर्धा प्रमुख प्रा.योगेश कुलकर्णी (भ्रमणध्वनी क्रमांक – 9403037011) तसेच स्पर्धा सहप्रमुख प्रा.तुळशीराम मुंढे (भ्रमणध्वनी क्रमांक – 8698795411) यांच्याकडे करावी असे आवाहन स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी केले आहे.
=======================