
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीला अवघी काही दिवस शिल्लक राहिलेली असताना आ.नमिता मुंदडा यांना दररोज अनेकांचा पाठिंबा व सहकार्य लाभत आहे. आ.मुंदडा यांच्या समर्थकांत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असताना दिसत आहे. युवक कार्यकर्ते सोहेल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला असून ते आ.नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता काही दिवस शिल्लक राहिला असल्यामुळे हा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. केज विधानसभा मतदारसंघातील अठरापगड जातींचे कार्यकर्ते आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी कामाला लागले असतांनाच भारतीय जनता पक्षाच्या विकासप्रिय आमदार नमिताताई यांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा लाभत आहे. भाजपामध्ये आता मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्ते सोहेल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली तरूण कार्यकर्त्यांचे इन्कमिंग वाढले आहे. आ.नमिता मुंदडा यांच्यावर असलेला वैयक्तिक विश्वास, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे भाजपात इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील कुरेशी मोहल्ला, बाराभाई गल्ली, झारेकरी गल्ली या गल्लीत मुस्लिम समाजाचे लोक अधिक प्रमाणात राहतात. याच विभागातील तरूण कार्यकर्ते सोहेल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.
मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना भाजपा न्याय देणार – अक्षय मुंदडा
भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून तो सर्वधर्मसमभाव हा विचार घेवून चालणारा पक्ष असून जे मुस्लिम बांधव राष्ट्र विचारसरणीचे आहेत त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष हा सतत पाठीमागे राहिला आहे. केज विधानसभा मतदार संघातील ही होवू घातलेली विधानसभा निवडणुक जातीपातीच्या मुद्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर लढली जात असल्यामुळे या विभागातील सर्व समाजातील मतदार हा आ.नमिता मुंदडा यांच्या पाठीशी उभा असून मुस्लिम समाजातील मतदारांना आम्ही कधीही अंतर दिले नाही व यापुढेही देणार नाहीत असे अक्षय मुंदडा यांनी यावेळी सांगितले.
सर्व शक्ती पणाला लावून आ.नमिताताई यांच्या विजयासाठी प्रयत्न – सोहेल कुरेशी
यावेळी बोलताना सोहेल कुरेशी म्हणाले की, केज विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांच्या कालावधीत विशेषतः शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या कालावधीत आ.नमिता मुंदडा यांनी केलेली विकासकामे ही मतदारसंघाचा आणि अंबाजोगाई शहराचा कायापालट करणारी आहेत. त्यांच्या या विकासात्मक दृष्टिमुळेच आज शेकडो कार्यकर्त्यांनी आ.नमिता मुंदडा यांच्या मागे आपली संपूर्ण शक्ती उभी करून त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. हे सर्व कार्यकर्ते आ.मुंदडा यांच्या प्रचारात सक्रिय होतील व त्यांच्या गळ्यात विजयी हार घालतील असे त्यांनी सांगितले.
शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश :
यावेळी अक्षय मुंदडा यांच्या उपस्थितीत सोहेल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली या विभागातील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सुनियोजित करण्यासाठी भाजपाच्या आ.नमिता मुंदडा यांचे खंदे समर्थक माजी उपनगराध्यक्ष सारंग (भाई) पुजारी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, महेमूदमियाॅं कुरेशी यांच्यासह अनेकांनी विशेष प्रयत्न केले.