अंबाजोगाई (प्रतिनिधी) श्री दत्त जयंतीनिमित्त मौजे पुस (ता.अंबाजोगाई) येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर येथे ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे पुस येथे श्री दत्त जयंतीनिमित्त श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सोमवार, दि.०९ डिसेंबर ते रविवार, दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत करण्याचे योजिले आहे. यावेळी भागवत कथाकार ह.भ.प.कांतादेव महाराज वडगाव (दादाहरी) यांना अशोक महाराज गित्ते-नंदागौळ, ह.भ.प.अंकुश महाराज पुरी व तबला वादक ह.भ.प.बंकटकुमार बैरागी, ह.भ.प.अशोक महाराज गायके यांची साथसंगत लाभणार आहे. दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ६ ते ७ अभिषेक व आरती, ७ ते ११ गुरूचरित्र पारायण, १ ते ४ भागवत कथा, ४ ते ६ महाप्रसाद, सायं.६ वाजता आरती होणार आहे. १४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प.भुषण महाराज तळणीकर (मोहगाव) यांचे दत्तजन्माचे किर्तन व पालखी सोहळा संपन्न होईल. श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता रविवार, दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी ह.भ.प.प्रेममुर्ती महेश महाराज माकणीकर यांचे काल्याचे किर्तन व नंतर सार्वजनिक गांवकरी मंडळींच्या महाप्रसादाने होईल. यावेळी गायनाचार्य ह.भ.प. कैलास महाराज मुरकुटे, आप्पा महाराज पट्टीवडगांवकर, अंकुश महाराज पुरी-घाटनांदूरकर, अशोक काका गित्ते-नंदागौळ, मृदंगाचार्य बंकटकुमार वैरागी, अशोक गायके-पुसकर तसेच पंचक्रोशीतील नामवंत व गुणीजन भजनी मंडळ उपस्थित राहतील. श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजनासाठी समस्त गावकरी मंडळ पुस यांनी पुढाकार घेतला आहे.