
सहकार भारती स्थापना दिवस ; मान्यवरांची उपस्थिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना व्याख्याते प्रकाश पाठक (सनदी लेखापाल) यांनी ‘पंचप्रण’ – सामाजिक परिवर्तनाची गुरूकिल्ली या विषयावर आपले अभ्यासपूर्ण चिंतन मांडले.
कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय, लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव कांदे (रा.स्व.संघ, जालना विभाग), प्रमुख व्याख्याते प्रकाश पाठक (सनदी लेखापाल, धुळे), बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, बँकेच्या माजी अध्यक्ष व विद्यमान संचालिका शरयूताई हेबाळकर, सर्व संचालक श्री मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, प्रा.अशोक लोमटे, बाळासाहेब देशपांडे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तृतीय पुष्प गुंफताना प्रकाश पाठक (धुळे) यांनी ‘पंचप्रण’ – सामाजिक परिवर्तनाची गुरूकिल्ली या विषयावर बोलत असताना सांगितले की, आजच्या व्याख्यानाचा विषय आपल्या जगण्याशी एकरूप आहे. ‘पंचप्रण’ – म्हणजे कुटुंब, समरस जीवन, पर्यावरण, स्वदेशी जागरण आणि नागरिकांची कर्तव्ये हे समजून घेवून देशासाठी त्याग, समर्पण भावनेतून बलिदानासाठी तत्पर असणे होय, या देशावर प्रेम करावे, संस्कृती संवर्धन करणे, निष्ठापूर्वक त्याचे पालन करणे आवश्यक आहे. आपली धारणा, निती मुल्यांवर श्रध्दा ठेवून वाटचाल करणे, समाजजीवन हे रथचक्रासारखे आहे. भूमिचा स्वर्ग करणारी माणसं कार्यरत झाली की, आपण पतनाकडून उत्थानाकडे जातो. जगात अनेक संस्कृती निर्माण झाल्या आणि कालौघात त्या नष्ट ही झाल्या पण, हिंदू धर्म व संस्कृती विनाशाच्या कालखंडातही संपुष्टात आली नाही. अध्यात्मिक राष्ट्र अशी जगात भारताची ओळख आहे. सामुहिक प्रयत्न व सर्वसमावेशकता जोपासल्यामुळे हे शक्य झाले आहे. समाजाच्या उत्थानासाठी स्वतःला गाडून घेण्याची भूमिका घ्यावी लागते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्श संकल्प, सातत्यपूर्ण विधायक कार्य आणि मार्गदर्शक सुत्रांमुळे सामाजिक जीवनात त्याचे चांगले पडसाद पहावयास मिळत आहेत. म्हणून आज विविध क्षेत्रात आदर्श, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रप्रेमी, समर्पण, न्याय भूमिका, निष्कलंक, निष्कपट भावना जोपासत सेवाकार्य करीत योगदान देणारी व्यक्तीमत्व निर्माण झाली आहेत असे सूचक वक्तव्य पाठक यांनी केले. स्वातंत्र्य, बंधूता, समजूतदारपणा, कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध, संस्कार, संस्कृती, पर्यावरण संवर्धन, देशाभिमान, सामाजिक समरसता, स्वयंपूर्णता, स्वयंसज्जता, स्वयंसक्षमीकरण, कर्तव्यधिष्ठता निर्माण झाली पाहिजे. यासाठी भारतीयांनो वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक पातळीवर आपण एकत्र येऊन सामाजिक परिवर्तनासाठी सुरूवात केली पाहिजे. आज संपूर्ण जग हे विध्वंसाला वैतागले आहे, भारताच्या पुढाकाराने जगात शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा करतेय, विश्वगुरू म्हणून आपल्यावर असलेल्या या जबाबदारीची जाणीव ठेवून नि:स्पृह, त्याग भावनेतून आपले योगदान द्यावे व भविष्यातील यशस्वी वाटचाल करावी असे आवाहन प्रकाश पाठक (धुळे) यांनी केले. प्रारंभी बँकेच्या संचालिका शरयूताई हेबाळकर यांनी ‘सहकार भारती – सहकाराचे एक शिखर संघटन’ या विषयावर बोलत असताना आण्णासाहेब गोडबोले, धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, माधवराव गोडबोले आणि लक्ष्मणराव इनामदार यांच्या पवित्र स्मृतींचे स्मरण केले. ‘सहकार भारती स्थापना दिवस’ निमित्त मागील 46 वर्षांपासून सहकार भारती सहकार क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची नेमकी माहिती दिली. यावेळी ‘सहकार भारती जिंदाबाद’ चा जयघोष करण्यात आला. अध्यक्षीय समारोपपर भाषणात उत्तमराव कांदे (रा.स्व.संघ, जालना विभाग) यांनी दीनदयाळ बॅंकेने परिसरातील बॅंका, पतसंस्था, पतपेढी व सहकारी संस्था यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांना सहकार भारती परिवाराशी जोडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरूवातीला पाहुण्यांचा परिचय बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी करून दिला. सुत्रसंचालन संचालक मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी मानले. सौ.लताताई पत्की यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक, रसिक श्रोते उपस्थित होते. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि.12 जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकुजी दादा इदाते (दापोली) यांच्या ‘सामाजिक आचारसंहितेची गाथा – संविधान’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. तसेच 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी होईल. अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
=======================