
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दि. 14/01/2025
शिक्षण हे मानवाच्या प्रगतीचे साधन आहे. शिक्षणातून चारित्रसंपन्न नागरिक घडावा. शिक्षक हा देशाच्या रथाचा चालक आहे. तो कोणत्याही काळात आदर्शच आसतो असे विचार प्रा. गौतम गायकवाड यांनी मांडले. ते येथील खोलेश्वर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर बोलत होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भा.शि.प्र. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी हे होते. विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक फुलारी, उपप्राचार्य डॉ. बिभिषण फड , उपप्राचार्य प्रा. आनंद पाठक , प्रा.सतीश हिवरेकर हे उपस्थित होते.
प्रा.गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, माणूस घडविण्याचे साधन शिक्षक आहे. माणसाचे चारित्र शुध्द असणे महत्वाचे आहे. शिक्षक देशाच्या रथाचे चालक आहेत. ते कोणत्याही काळात आदर्श आसतात. ते समाजाच्या व देशाच्या कल्याणासाठी कार्यरत राहीले पाहिजेत तसेच शिक्षणाचे खाजगीकरण होऊ नये. शिक्षण हे शासनाच्या हाती असले पाहिजे. कालसुसंगत शिक्षण देणे आवश्यक आहे.कोणत्याही देशात शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरण होऊ नये, तसे झाले तर देश मरतो, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील शिक्षक, संस्थाचालक यांची कर्तव्य ही त्यांनी विषद केली.
अध्यक्षीय समारोप करतांना राम कुलकर्णी म्हणाले की, आजचा दिवस मकरसंक्रांतीचा शुभ दिन आहे. या दिनी माणसाच्या मनाचे संक्रमण झाले पाहिजे. मनात एकमेकांबद्दल गोडवा निर्माण झाला पाहिजे. झोपडीतील माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक माणूस ज्ञानी झाला पाहिजे. शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगिण विकास होतो. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. म्हणून समाजाला मार्गदर्शन करणारा शिक्षक आहे. त्यांच्याकडून स्वत:सोबत समाजाची, देशाची उन्नती अपेक्षीत आहे. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणून झोपडीतील माणसासाठी शिक्षणाची दारे उघडली व त्यांचा उत्कर्ष झाला, म्हणून बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जिजाराम कावळे यांनी केले , आभार प्रा. अजय डुबे यांनी मानले तर विद्यापीठ गीत प्रा.शैलेश पुराणिक यांनी सादर केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.