
नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीचा वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धेसाठी पुढाकार
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथील नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीने नेहमीप्रमाणेच पुढाकार घेतला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबाजोगाईत मंगळवार, दिनांक २८ जानेवारी रोजी नवकेशर नृत्य महोत्सवाअंतर्गत वैयक्तिक व समुहनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक भिमाशंकर शिंदे व प्रा.आरती भिमाशंकर शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आयोजक भिमाशंकर शिंदे यांनी सांगितले की, शहरात मागील १७ वर्षांपासून नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीच्या वतीने अंबाजोगाईचा वसा आणि वारसा जोपासत आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्यपूर्ण विधायक प्रयत्न करण्यात येत आहेत. अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी विश्व, देश, राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरीय विविध वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी होवून उज्ज्वल यश संपादन करीत अंबाजोगाईचे नांव उंचावले आहे.
लवकरच माता श्री योगेश्वरी देवीचा महिमा सांगणारे मराठी गीत व व्हिडिओ अल्बम निर्मिती करणार आहोत. यापुढील काळातही नृत्य क्षेत्रात नवप्रतिभांना योग्य संधी, व्यासपीठ आणि मंच उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी पासून प्रथमच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवार, दिनांक २८ जानेवारी रोजी आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई या ठिकाणी नवकेशर नृत्य महोत्सवाअंतर्गत वैयक्तिक नृत्य व समुहनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हे या स्पर्धेचे पहिले वर्ष आहे. या स्पर्धा ४ गटांत आयोजित करण्यात आल्या आहेत. लहान गट इयत्ता १ ली ते ४ थी, मोठा गट इयत्ता ५ वी ते १० वी, खुला गट इयत्ता ११ वी पासून पुढील मुली व महिलांसाठी आणि दिव्यांग गटात शारीरिक अपंगत्व प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंगळवार, दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य वैयक्तिक नृत्य स्पर्धा तर दुपारी ३ वाजता समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढीलप्रमाणे नियम व अटी आहेत. त्या अशा की, वैयक्तिक नृत्याप्रकारामध्ये विद्यार्थ्यांची पूर्वनिवड चाचणी (ऑडीशन) होईल. ज्या विद्यार्थ्यांचे निवड चाचणीमध्ये (ऑडीशन) निवड होईल त्यांनाच स्पर्धेत सहभाग दिला जाईल. वैयक्तिक नृत्यासाठी ३ मिनिटे तर समुह नृत्यासाठी ६ मिनीटे वेळ दिला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. नांव नोंदणी शिवाय स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. गीत निवडण्याचे पुर्ण स्वातंत्र शाळांना व विद्यार्थ्यांना राहिल फक्त गीत अश्लील नसावे. ऐनवेळी स्पर्धेच्या नियमात कुठलीही पुर्वसुचना न देता बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजक व संयोजकांकडे राहतील. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय या प्रमाणे पारितोषिके देण्यात येतील. वैयक्तिक नृत्य स्पर्धेची निवड चाचणी शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी, अंबाजोगाई या ठिकाणी घेण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजक भिमाशंकर शिंदे (९७६५१४४८७३), संयोजन समितीचे प्रा.अनंत कांबळे (८६००१३४००७), गणेश तौर (७०२०१६७४६५), सुशिल कुंबेफळकर (९४२१३३६८१९), विक्रमसेन आगळे (८३२९४७५२३९), सुनिल व्यवहारे (९३२५७६२८१७), बळीराम उपाडे (९९७०३८३८५६) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच भव्य वैयक्तिक व समुहनृत्य स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नवकेशर नृत्य महोत्सवाच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.