
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या घरातील ई – कचरा श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, प्रगती विभाग शाळेत जमा करून आपला अमूल्य सहभाग आपण नोंदवावा, असे आवाहन या संकलन फेरीद्वारे विद्यार्थ्यांनी सर्वांना केले.
या ई-कचरा जनजागृती संकलन फेरी प्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय समन्वयक चंद्रकांत मुळे, केंद्रीय विद्यासभा उपाध्यक्ष उमेश जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, प्रगती वर्ग विभागप्रमुख सौ.वर्षा मुंडे व शिक्षकवृंद उपस्थित होते. ई – कचरा अंतर्गत येणाऱ्या अनेक वस्तू जमा करण्यास सर्वांना सांगितले. पर्यावरण रक्षणासाठी शहरांमधील नागरिकांना जास्तीत जास्त संख्येनी ई-कचरा नजीकच्या संकलन केंद्रांवर आणून द्यावा आणि सुयोग्य कचरा व्यवस्थापनाला चालना देत पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलावा, असेही विद्यार्थ्यांनी सर्वांना सांगितले व त्यासंदर्भात पत्रकही वाटप केले. ही संकलन फेरी कुत्तर विहीर, केशवनगर, दीनदयाळ कॉलनी, चौसाळकर कॉलनी व आंबेडकर चौक या मार्गे काढण्यात आली. मुख्याध्यापक व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक बंधू-भगिनींच्या सहकार्याने ई-कचरा संकलन फेरी यशस्वी झाली. ई-कचरा जनजागृती व कचरा संकलन अभियान प्रजासत्ताक दिनानिमित्त राबविण्याचे प्रांत पर्यावरण शिक्षण गतीविधी यांच्या वतीने ठरविले असून, या मध्ये आपली संस्था सहभागी होऊन आपण हा उपक्रम आपल्या स्थानिक ठिकाणी येत्या २६ जानेवारी २०२५ च्या आधी ई कचरा संकलन केंद्राची उभारणी करणार आहोत. ई कचरा म्हणजे काय ? निरूपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून तयार झालेला कचरा म्हणजे ई कचरा त्यामध्ये निरुपयोगी वस्तू मोबाईल, घड्याळ, लॅपटॉप, कॅम्पुटर, टीव्ही, रिमोट, इ.वस्तूचा समावेश आहे. हा उपक्रम सोसायटी , व्यवसायाचे ठिकाण, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाण, कंपनी, घरोघरी विद्यार्थ्यांना, पाठवून गृह संपर्क करावयाचा असून तो ई-कचरा आपल्या स्थानिक ठिकाणी म्हणजेच शाळेत संकलित करावा. या उपक्रमामध्ये आपल्या संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभागी आहेत. कचरा मुक्त पर्यावरण हा उपक्रम राबविण्या मागचा उद्देश आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
=======================