
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील उज्जोत फाऊंडेशन आणि योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उज्जोत प्रिमियर लीग-२०२५’ चे अंबाजोगाईत आयोजन करण्यात आले होते. या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा नुकताच शानदार समारोप झाला. या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक १९५ धावा करणारा वैभव प्रभाकर लाड हा खेळाडू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. त्याच्यासह विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उज्जोत प्रिमियर लीगला क्रिकेटप्रेमींचा भरभरून प्रतिसाद लाभला.
अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य राजमाता जिजाऊ मैदानावर उज्जोत फाऊंडेशन आणि योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उज्जोत प्रिमियर लीग-२०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नवकेशर सुपर किंग, अजिंक्य सिसी, आर.आर.पॉलिटेक्निक, द लिगल ईगल, आयडियल क्रिकेट क्लब आणि विराट वायपर्स या सहा संघांनी सहभाग घेतला होता. हे सामने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या वेळेत खेळविण्यात आले. या सामन्यांचे पंच (अंपायर) म्हणून संघर्ष इंगळे आणि अशोक खाडे यांनी काम पाहिले. तर सामन्याचे बहारदार समालोचन (कॉमेंट्री) ज्योतिराम परळकर यांनी केले. हे रोमहर्षक सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक १९५ धावा करणाऱ्या वैभव प्रभाकर लाड याने दमदार फलंदाजी केली. वैभव हा खेळाडू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. त्याला प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य मारूती कानिटकर, क्रीडा शिक्षक रमण सोनवळकर यांनी ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज-२०२५’ ची ट्रॉफी दिली. तसेच अनेकांनी रोख पारितोषिके दिली. वैभवाच्या अजिंक्य क्रिकेट क्लबने स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम रूपये तीस हजार व चॅम्पियन ट्रॉफी पटकावली.
अजिंक्य क्रिकेट क्लबचे कर्णधार पियुष गुळभिले यांनी संघाच्या वतीने हे पारितोषक स्विकारले. वैभव लाड हा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू आहे, आघाडीचा फलंदाज आणि उजव्या हाताने लेग ब्रेक करणारा गोलंदाज आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीत तरबेज आहे. विविध स्पर्धेत वैभवने आपल्या अष्टपैलू कामगिरीने ठसा उमटविला आहे. तो मुळचा लाडेवडगावचा आहे. त्याची जडणघडण अंबाजोगाईत झाली. फक्त क्रिकेट खेळण्यासाठी तो सध्या मुंबईत शिफ्ट झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सी डिव्हीजन मध्ये कामत क्लब, फ्रेंड्स युनियन क्लबकडून कांगा लीग, डोंबिवलीकडून समर कॅम्पमध्ये खेळतो. वैभवने राजस्थान येथील मारवाड प्रीमियर लीग स्पर्धेत अनोखे कौशल्य दाखवून लक्षवेधी कामगिरी केली. उच्च दर्जाच्या रोहीत शर्मा क्रिकेट अकादमी आणि केकेआर अकादमीत त्याने अभिषेक नायर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. वैभवला प्रशिक्षक गोपेंद्र बोहरा (मुंबई), विकास निरफळ (लातूर), मोहित परमार (अंबाजोगाई), पराग मडगेकर, विकी गुप्ता, बलविंदरसिंग संधू, मनोज सर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोठ्या भावाची प्रेरणा तसेच आई-वडिलांचा आशिर्वाद लाभत आहे. वैभवने महाराष्ट्र आमंत्रित स्पर्धा-२०२३ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. अंडर १९ मध्ये वेंगसरकर अकादमीच्या विरूद्ध खेळताना कसोटी सामन्यात १३० धावा काढल्या आहेत. तसेच केवळ ३८ बॉलमध्ये त्याने १०० धावा काढल्या आहेत. आजपावेतो वैभवने राजस्थान, महाराष्ट्र, मुंबई, लातूर आणि उस्मानाबाद या संघांचे वेळोवेळी प्रतिनिधित्व करीत अनेक सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रात ‘लाड’ने आपल्या अष्टपैलू कामगिरीने बीड जिल्ह्याचे ‘वैभव’ वाढविले आहे हे विशेष होय. त्यामुळे आपण सर्वांनी वैभवला सर्वोतोपरी मदत, सहकार्य आणि मार्गदर्शन करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे ही काळाची गरज आणि आपली जबाबदारी आहे.