24/06/2025
Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार वि.बनवसकर हे नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या सेवापूर्तीचा सेवा गौरव सोहळा मंगळवार, दिनांक ३ जुन २०२५ रोजी गोपीनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाईच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

सेवा गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुर्यकांतराव कुलकर्णी (कार्यकारी संचालक, एस.ई.डी.टी.पुणे.), तर यावेळी प्रमुख निमंत्रित म्हणून प्रसाददादा चिक्षे (ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई.) यांच्यासह दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रा.गो.धाट, संचालक इंजि.बिपीन क्षीरसागर, प्राचार्य डॉ.किशन पवार, प्रा.अशोक लोमटे, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, बाळासाहेब देशपांडे, जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी तसेच सत्कारमूर्ती सनतकुमार वि.बनवसकर व सौ.स्वातीताई बनवसकर या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थित होती.

प्रारंभी दिपप्रज्ज्वलन आणि भारतमाता व पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश शेळके (प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी केले. त्यांनी सेवा गौरव सोहळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंर बँकेच्या वतीने अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक प्राचार्य डॉ.किशन पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सनतकुमार वि.बनवसकर व सौ.स्वातीताई बनवसकर यांचा एकत्रित सन्मान करण्यात आला. सत्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्री विघ्नहर्ता मूर्ती, साडी-चोळी, फेटा, शाल, पुष्पगुच्छ व पुष्पहार असे होते. याप्रसंगी ज्येष्ठ बंधू ह.भ.प.शरदराव महाराज बनवसकर, सौ.प्रतिभाताई बनवसकर, मुलगा स्वराज बनवसकर यांच्यासह संपूर्ण बनवसकर परिवार, नातेवाईक आणि मित्र मंडळी उपस्थित होते. या सर्वांचा यथोचित सन्मान बॅंकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सुदर्शन टाक, प्रविण जोशी यांच्या वतीने सौ.प्रतिक्षा जोशी, झंवर काका, संचालक इंजि.बिपीन क्षीरसागर, श्री पेकमवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आशिर्वादपर सदिच्छा व्यक्त करताना बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रा.गो.धाट यांनी सांगितले की, सनतकुमार बनवसकर यांनी बँकेविषयी निखळ निष्ठा ठेवली, कोणाचा अनादर केला नाही. कोणाला दुखावले नाही. प्रामाणिकपणा जोपासत समत्व बुध्दीने झोकून देऊन पण, सहकाराचे तत्व अंगिकारत, चौकटीत राहून बँकेच्या सर्वांगिण विकासासाठी निर्भयपणे कार्य केले. बनवसकर यांचा मला खूप अभिमान आहे. असे गौरवोद्गार प्राचार्य धाट यांनी काढले. तर यावेळी बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख म्हणाले की, बनवसकर यांनी कधी ही नियमबाह्य काम केले नाही. म्हणून त्यांची संपूर्ण कारकीर्द ही यशस्वी ठरली. बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी बनवसकर यांच्यासोबत काम करताना वयाचे अंतर जाणवले नाही. ते एक प्रामाणिक अधिकारी आहेत. संपूर्ण कारकीर्दीत निरपेक्ष काम केले. बँकेच्या हिताविरूध्द काम केले नाही. कारण, त्यांचा हेतू नेहमीच स्वच्छ होता. बँकेच्या सुरूवाती पासून बनवसकर यांनी अनमोल योगदान दिले असे गौरवोद्गार ऍड.पत्की यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना सनतकुमार बनवसकर यांनी बॅंकेतील नौकरीचा पहिला दिवस ते सेवानिवृत्त झालेल्या अखेरच्या दिवसापर्यंत कार्य केले, कोणा-कोणाची मदत, सहकार्य, मार्गदर्शन लाभले याची संबंधितांच्या नांवांसह माहिती दिली. कुटुंबातील आई, आत्या, ज्येष्ठ बंधू, भगिनी, पत्नी आणि मुलांचे वेळोवेळी पाठबळ मिळाले असे सांगितले. सुर्यकांत कुलकर्णी आणि संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रा.गो.धाट यांच्यामुळे आपण घडलो असे सांगून २८ वर्षे बॅंकेचे तत्कालीन सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी, ग्राहक आणि हितचिंतक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. काम केले पण, कोणाला उपद्रव केला नाही अशी आपली साठा उत्तराची कहाणी आहे असे बनवसकर यांनी नमूद केले. तर प्रमुख अतिथी प्रसाददादा चिक्षे यांनी अतिशय मोजक्या व नेमक्या शब्दांत बनवसकर यांचे कार्यकर्तृत्व, स्वभाव, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य याबाबत भाष्य केले. बनवसकरांनी स्वतःच्या कर्मावर संस्कार करीत सोबतच्या २०० सहकाऱ्यांना घडविले, २८ वर्षे बॅंकेशिवाय दुसरा विचार केला नाही. ते प्रत्यक्ष बॅंकिंग जगले. ग्राहकांना खुष ठेवले. असे चिक्षे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना सुर्यकांतराव कुलकर्णी म्हणाले की, आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याचा सत्कार करायला ही भाग्य लागते, बनवसकरांनी बॅंकेची नौकरी नव्हे तर खऱ्या अर्थाने संसार केला. नौकरीचा आनंद घेतला. प्रत्येक गोष्ट शिकून ते बॅंकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ झाले. त्यांनी लीडर तयार केले. सहकाराचे तत्व पाळून अनेकांना फायदा करून दिला. त्यांनी जे केलं ते पुष्कळ केलं. सगळ्यांना समजून घेत, समरस होत सामावून घेतले. बॅंक वाढवली, मोठी केली. बॅंकेविषयी निष्ठा ठेवली. त्यांना मॅनेजमेंट जमली. बनवसकरांच्या कुटुंबात संत परंपरेचा संस्कार आहे. वैराग्य हे संतांचे लक्षण आहे. हे लक्षण बनवसकरांमध्ये आढळून येते. बनवसकरांसारखी माणसं वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ही मिळत नाहीत अशा शब्दांत कुलकर्णी यांनी बनवसकरांचे कौतुक केले. यावेळी सभागृहात भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, राजू मोरे यांच्यासह बॅंकेचे माजी संचालक, सभासद, ठेविदार, ग्राहक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, मराठवाड्यातील विविध बॅंकांचे प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय व सन्मानपत्राचे वाचन प्रतिभा गोस्वामी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मंगेश गोस्वामी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली. सेवापूर्तीच्या सेवा गौरव सोहळ्याच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, सन्माननीय संचालक मंडळ आणि महेश शेळके (प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेच्या समस्त अधिकारी व कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
आमच्याशी संपर्क करा.