
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत स्पृहणीय यश मिळविले आहे. त्यामुळे नवकेशरच्या ६ स्पर्धक विद्यार्थ्यांची निवड ही थायलंड येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल निवड झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीचे प्रमुख भिमाशंकर शिंदे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत आमच्या ६ विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश मिळविले आहे. त्यामुळे या स्पर्धेत पात्र ठरलेले स्पर्धक विद्यार्थी थायलंड येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. या स्पर्धकांमध्ये श्रावणी साखरे, अद्विक रांदड, सौम्या जोगदंड, आद्या मोमले, गणेश बाहेती आणि आर्यन नांदुरे यांचा समावेश आहे. जे स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेत विजयी होतात फक्त तेच स्पर्धक विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी पात्र ठरतात.
नवकेशर सेवाभावी संस्था अंतर्गत नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी ही मागील तब्बल १७ वर्षांपासून संस्थेच्या अध्यक्षा सौ.आरती भिमाशंकर शिंदे (लिंबगावकर) यांच्या सातत्यपूर्ण सहकार्य व मार्गदर्शनानुसार अविरत सुरू आहे. आता पर्यंत आपल्या अकॅडमी मध्ये तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आज पर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करीत सहभाग घेतला आहे. अखिल भारतीय सांस्कृतित संघ, पुणे आयोजित सन २०१४ साली सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत आपल्या अकॅडमीचे सहा विद्यार्थी विजेते झाले आहेत. त्यानंतर सन २०१८ साली दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अकॅडमीची विद्यार्थीनी श्रेया बजाज ही सुवर्णपदक विजेती ठरली व सन २०१९ मध्ये पुन:श्च एकदा सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अकॅडमीच्या ७ विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉंझ मेडल मिळाले. मागील १७ वर्षांपासून आपण विद्यार्थ्यांना नृत्य व नाट्य क्षेत्रात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी अल्बम, राज्य नाट्य स्पर्धा, शॉर्ट फिल्म अशा वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळवून दिली जाते. आपल्या अकॅडमी मध्ये वय वर्षे ४ पासून पुढील सर्वच वयोगटातील विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. नृत्य शिकल्यामुळे चित्रपट क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात, मराठी अल्बम अशा विविध क्षेत्रांत अनेक संधी आता सहज उपलब्ध होत आहेत. तसे पहायला गेले. तर नृत्य व त्याचे खूप सारे फायदे आहेत, नृत्यामुळे शारीरिक स्वास्थ सांभाळले जाते, मानसिकदृष्ट्या तणावमुक्त जीवन जगता येते. आपल्या अकॅडमी मध्ये बॉलिवूड, लावणी, वेस्टर्न, सेमी क्लासिकल, हिप हॉप, कंटेम्पररी व सर्व महाराष्ट्रीयन लोकनृत्य प्रकार ही शिकविले जातात. नवकेशर अकॅडमी सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हाच होता की, जे नृत्य विषयक शिक्षण मला अंबाजोगाईत मिळाले नाही. ते येथील विद्यार्थ्यांना सहजपणे मिळावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नृत्य क्षेत्रात आपले करियर करता यावे. अंबाजोगाई ही कलावंतांची खाण म्हणून ओळखली जाते. पण, या कलावंतांना योग्य मार्गदर्शन मिळावे व योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी या अकॅडमीची आमच्याकडून सुरूवात करण्यात आली. आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये ही काम करीत आहेत. ज्यात नंदन नावंदर आणि ऋषिकेश मुंदडा यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. लवकरच आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ‘आई योगेश्वरी देवी’ची महिमा सांगणारे मराठी अल्बम व शॉर्ट फिल्मची निर्मिती करणार आहोत.
अंबाजोगाई मधील नवकेशर ही पहिली वेस्टर्न डान्स अकॅडमी आहे. अकॅडमी सुरू केली तेव्हा अंबाजोगाईकरांनी आमच्यावर प्रेम व्यक्त करीत, विश्वास ठेवून भरभरून प्रतिसाद दिला. अंबाजोगाई मध्ये कलेची आणि योग्य कलावंतांची कदर करणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे मला काम करताना खूप लोकांनी मदत केली आहे. ग्रामीण भाग असल्याने अकॅडमीच्या सुरूवातीच्या काळात अनेक अडचणीं ही आल्या पण, योग्य नियोजन, साफ नितिमत्ता, माझी कलेवरील निष्ठा आणि प्रेम या गोष्टींच्या बळावर, सर्वांच्या सदिच्छा व आशिर्वाद यांच्या आधारावर आज अंबाजोगाई मध्ये तब्बल १७ वर्षांचा प्रवास आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करीत आहोत याचे आनंद व समाधान आहे. पुढील काळात ही नृत्य, सांस्कृतिक, नाट्य या क्षेत्रात अंबाजोगाईकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भागातील नवप्रतिभांना नवकेशरच्या माध्यमातून एक दर्जेदार व सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आश्वासक मनोदय नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमीचे प्रमुख भिमाशंकर शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.