स्पर्धा परीक्षेचे महत्त्व ओळखा अन् मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा – पोलीस निरीक्षक शरद जोगदंड
आयडियल उपक्रम राबविणारे संकल्प विद्या मंदिर – डॉ.राजेश इंगोले
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरातील प्रशांतनगर भागात अल्पावधीत नांवारूपाला आलेले संकल्प विद्या मंदिर येथे इयत्ता दहावीच्या व विविध स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त, विविध मेडल्स प्राप्त, गुणवत्ता यादीमध्ये झळकलेल्यांसह एकूण २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी आयोजित केला होता.
येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप खाडे हे होते. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, युवा वक्ते तथा एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले प्रा.शहाबाज मनियार, सामाजिक कार्यकर्ते भिमसेन लोमटे, शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम व्यक्तिमत्व गोवर्धन लांब, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, स्पर्धा परीक्षा समन्वयक संतोष राऊत यांची तर विचारमंचावर संस्थाध्यक्ष कैलास चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांची ही उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने स्कॉलरशिप टॅलेंट सर्च, ज्युनियर आयएएस, एमटीएस (जळगाव) यासह विविध परीक्षेत विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. असे सांगून वर्षभर संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश स्पंदन राजेश्वर स्वामी, विवान स्वप्निल चव्हाण, भूमिका बिजयसिंग भाबरदोडे, श्रुती आदिनाथ मुसळे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले तसेच यावेळी विविध मेडल्स प्राप्त २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता दहावीची पहिली बॅच अतिशय उत्कृष्ट गुण घेऊन अंबाजोगाई मध्ये एक वेगळा ठसा उमटविलाबद्दल त्याही विद्यार्थ्यांचा गुणगौरव याप्रसंगी करण्यात आला. सुरूवातीला बोलताना पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पालक व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याने सातत्यपूर्ण अभ्यास करून आई – वडिलांच्या कष्टाचे चीज करावे असे आवाहन करून उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा.शहाबाज मणियार यांनी बोलत असताना संकल्प विद्या मंदिर शाळांनी आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे संबंध स्पर्धा परीक्षा इयत्ता दहावीच्या मुलांना त्यांच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी संकल्प विद्या मंदिर ही आयडियल उपक्रम राबविणारी शाळा असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षा संदर्भात सातत्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला. नेहमीप्रमाणेच त्यांनी विविध उदाहरणे देत, महामानवांचे संदेश, संदर्भ व त्यांच्या कार्याचे दाखले देत विद्यार्थी आणि उपस्थित पालकांशी दिलखुलास संवाद साधला व अतिशय मौलिक असे मार्गदर्शन केले. डॉ.इंगोले यांच्या समायोचित मार्गदर्शनामुळे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. याप्रसंगी प्रदीप खाडे यांनी ही संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून मनाला समाधान वाटले असे नमूद केले. या शाळेत शिकणारे विद्यार्थी व त्यांचे पालक नशिबवान आहेत. तर ज्यांचा प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू झाला आहे अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतो. त्यामुळे मला या चोले दांम्पत्याचा व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक वाटते. कारण, ३५ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला प्रवास हा सोपा नसतो. हे यश शिक्षकांचे सातत्यपूर्ण योगदान व विद्यार्थ्यांचे परीश्रम यामुळे हे संपादन करता आले. विद्यार्थ्यांनो खूप खेळा, खूप शिका व अभ्यास करा. आनंदी रहा असे आवाहन प्रदीप खाडे यांनी केले. यावेळी माता, पिता पालक, विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पंदन स्वामी, अक्षरा निकम, भक्ती गायकवाड या इयत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षिका श्रीमती पी.एच.नायक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्रीमती शामल सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संकल्प विद्या मंदिर शाळेचे शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तर सांगता वंदे मातरम् ने झाली.
=====================
