
जातीअंत संघर्ष समितीची अंबाजोगाईत तीव्र निदर्शने
अंबाजोगाई (वार्ताहर)
समाज विघातक तत्वे सरकारी आशीर्वादाने मोकाट सोडली गेलीत, म्हणून ते समाजात अराजक अशी परिस्थिती निर्माण करीत आहेत, देशासह महाराष्ट्रात महिला व मुली सुरक्षीत नाहीत, धर्मात आणि जातीत सतत तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष केले जात आहे. देशात व राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कुठे ही अबाधीत नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करीत आहोत असे कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी सांगितले, शनिवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने अंबाजोगाईत तीव्र निदर्शने करण्यात आली.
शहरातील उपजिल्हाधिकारी, कार्यालयासमोर जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांना माकपचे ज्येष्ठ नेते तथा जाती अंत संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी संबोधित केले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र व देशात समाज विघातक तत्वे सरकारी आशीर्वादाने मोकाट सोडली गेलीत, म्हणून ते समाजात अराजक अशी परिस्थिती निर्माण करीत आहेत, महिला व तरूण मुली, देशात सुरक्षीत नसून त्यांचेवर अत्याचार होऊन खून पडत आहेत. महाराष्ट्रात बदलापूर येथे अमानुष अशी घटना घडली, अगदी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, कोल्हापूरात लहान मुलगी अत्याचार करून ठार केली. मुंबई, अकोला व काल अंबाजोगाई ग्रामीण मध्ये ही अत्याचार झाला, कलकत्ता येथे तर सामूहिक बलात्कार करून एक डॉक्टर तरूणीला ठार केले, असा घटनाक्रम देशात व राज्यात सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था कुठे ही अस्तित्वात नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करीत आहोत, धर्मात आणि जातीत सतत तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून काही तथाकथित बुवा, बाबा हे इतर धर्मांचा अनादर करणारी वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करीत आहेत, या लोकांचा बंदोबस्त करण्याऐवजी मुख्यमंत्री अशा लोकांचे समर्थन करीत आहेत. राज्यात कुठे ही संवैधानीक सामाजिक स्थिती नाही, केवळ राजकीय ध्रुवीकरण सरकार पक्ष करीत आहे, राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही, त्यांनी सत्तेतून जर पायउतार केला नाही. तर जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्विराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, शिवसेना (उबाठा) चे बालासाहेब शेप, अशोक हेडे, डॉ.नयनाताई सिरसट पाटील, संजिवनीताई देशमुख, राजाराम कुसळे, प्रशांत पवार, गुलनाझ, रेखा घोबाळे, पत्रकार देविदास जाधव, मरीबा भोसले, बाबा शेख, धीमंत राष्ट्रपाल आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निदर्शनात महिला व पुरूष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
=======================