
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने ५१५ कोटींच्या ठेवी पूर्ण करत ४ कोटी २० लाखांचा निव्वळ नफा मिळवला.
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- जनसामान्यांच्या आर्थिक विकासाला गती मिळून त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेची मागील २८ वर्षांपूर्वी निर्मिती केली असे मत अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी दि २४ रोजी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, यांच्यासह पिपल्स बँकेचे संचालक प्रा. वसंत चव्हाण, ॲड. विष्णुपंत सोळंके, सुरेश मोदी, ॲड. सुधाकर कऱ्हाड, संकेत मोदी, सुधाकर विडेकर, शेख दगडू शेख दावल, प्रकाश लखेरा, स्नेहा हिवरेकर, लक्ष्मण दासूद, हर्षवर्धन वडमारे, तज्ञ संचालक संदेश बोराडे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, ॲड. अनिल व्यवहारे, सचिन बेंबडे, हाजी महमूद, श्री. योगेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवनकर, श्री. योगेश्वरी मल्टिस्टेचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी, अलफलाह पतसंस्थेचे अध्यक्ष खालेद चाऊस तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे हे उपस्थित होते.
आर्थिक वर्ष सन २०२३-२४ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर आर्थिक वर्षात दिवंगत झालेले थोर नेते, देशभक्त, सैनिक, खेळाडू, विविध क्षेत्रातील तज्ञा व्यक्ती, बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक या सर्वांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर बँकेच्या सभासदांची विविध क्षेत्रात पदोन्नती तथा वेगवेगळ्या समित्यांवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे तसेच बँकेच्या सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल पाल्यांचे अभिनंदन केले.
मागील आर्थिक वर्षाचा इतिवृत्त बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी सादर केला. तसेच वार्षिक सभेपुढील विषयांचे वाचन जेष्ठ संचालक ॲड. विष्णुपंत सोळंके यांनी केले.
बँकेचे जेष्ठ सभासद जगताप यांनी बॅंकेच्या कामकाजा विषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक ही केवळ एक बँकच नसून ती राजकिशोर मोदी यांच्या रूपाने जनसामान्यांच्या जीवनाचा आर्थिक कणा बनली असल्याचे स्पष्ट मत जगताप यांनी मांडले. २४ ×७ अशी सेवा देणारी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने गरिबी व श्रीमंती यातील दरी कमी करण्याची जवाबदारी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळून त्यात यश मिळवल्याचे देखील अभिमानाने जगताप यांनी सांगितले. सोशल इंजिनिअरिंग काय व कसे असते ते राजकिशोर मोदी यांनी बॅंकेच्या माध्यमातून दाखवून देऊन एक सामाजिक, राजकिय व सांस्कृतिक सलोखा अतिशय उत्तम रित्या जोपासल्याचे जगताप यांनी याप्रसंगी नमूद केले. दुसरे जेष्ठ सभासद कऱ्हाड सर यांनी देखील आपले मनोगत मांडताना केज शहरात पिपल्स बँकेच्या शाखेची निर्मिती करावी जेणेकरून तेथील नागरिक, व्यापारी व तरुण बेरोजगार त्याचबरोबर युवा उद्योजक यांची सोय होईल याबाबत मागणी केली. भागवत मसने यांनी देखील आपले विचार या सभेत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषण व २०२३-२४ चा वार्षिक अहवाल सादर करताना बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने सन २०२३-२०२४ मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे व ग्राहकांच्या विश्वासामुळे ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या ठेवी ५१५ कोटी झाल्या असून यापुढेही असाच नवीन उच्चांक गाठण्याचे आवाहन बँकेच्या सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्गाने घेतले आहे. मार्च २०२४ अखेर बँकेचे वसूल भागभांडवल हे रू १८ कोटी असून मागील वर्षाच्या तुलनेत रुपये ०२ कोटीची वाढ झालेली आहे.बँकेचा स्वनिधी हा रुपये ४० कोटी २७ लाख असून त्यात मागिल वर्षीच्या तुलनेत ८.९८ % एवढी वाढ झाली आहे. राखीव निधी हा १३ कोटी ०६ लाख रुपये एवढा आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमास आधीन राहून ग्राहकांना रु.३२७ कोटी ५३ लाख रुपये एवढा कर्ज पुरवठा केला असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. मार्च २०२४ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु. २२२ कोटी ८५ लाख एवढी आहे. चालू वर्ष अखेरीस बँकेस करपसच्यात ४ कोटी २० लाखांचा नफा झाला असून बँकेच्या वतीने सभासदाना ९% घसघशीत असा लाभांश देण्याची घोषणा याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली. तसेच मार्च २०२४ च्या लेखा परीक्षण अहवालात प्रतिवर्षा प्रमाणे बँकेस “अ” दर्जा प्राप्त झाला आहे. बँकेची ही उंच भरारी पाहता बँकेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच कर्जदार , ठेवीदार व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे मोदी यांनी नमूद केले.अंबाजोगाई पिपल्स बँक ही आज अठरा शाखांच्या द्वारे ग्राहकांना सेवा पुरवीत आहे. नुकत्याच आणखी दोन नवीन शाखां रिझर्व्ह बँकेने मान्यतेनुसार अंबाजोगाई (चौसाळकर कॉलनी) व छत्रपती संभाजी नगर (सातारा परिसर) येथे सुरू केल्या आहेत. यापुढे परळी, केज, बनसारोळा, सोनपेठ, पुणे (पिंपरी चिंचवड) व मुंबई याठिकाणी सुद्धा बँकेच्या शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. तसेच बँकेने IT क्षेत्रात देखील ग्राहकांना तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे.डिजिटल बँकिंग च्या माध्यमातून UPI, IMPS, RTGS, ATM द्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील असल्याने मोदी यांनी यावेळी नमूद केले. मार्च २०२४ अखेरील बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची ही पावतीच असल्याचे राजकिशोर मोदी यांनी स्पष्ट केले.
मागील काळात अनेक सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट व सहकारी बँका डबघाईला येऊन दिवाळखोरी मध्ये निघाल्या. अनेक ठेवीदारांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. मात्र अशाही परिस्थितीत अंबाजोगाई पिपल्स बँक ग्राहक ठेवीदार व सभासदांच्या विश्वासाच्या बळावर ताठ मानेने आपला डोलारा पुढे नेत असल्याचा अभिमान संस्थापक राजकिशोर मोदी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर देखील कर्जधारक ग्राहकांचा विचार करुन बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले असे देखील मत बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. बँकेचे मा. सभासद, ग्राहक यांचा विश्वास, बँकेचे संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदाचे नियोजनबध्द कामकाज यामुळे सन २०२३-२०२४ मध्ये चांगले कामकाज करणे शक्य झाले. अशीच कामगिरी पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा बँकेचा प्रयत्न असेल असा आशावाद बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.
अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने केवळ अर्थकारण च न करता मागील काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान, रक्तदान शिबीर, कोरोना योध्दा सन्मान, बँकिंग क्षेत्रात महिला जनजागृती अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे व ग्राहकांसाठीच्या नवनवीन उपक्रमामुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. यापुढेही अर्थकारणासोबतच वारंवार असेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतील असा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला. बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बँकेचे अनेक सभासद, ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचलन भागवत मसने यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार आनंद टाकळकर यांनी व्यक्त केले. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बँकेच्या सभासद व ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात एक विरंगुळा मिळावा व त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी उदय साटम व ज्योती साटम निर्मित मराठी लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देखील अंबाजोगाई पंचक्रोशीतील ग्राहक व सभासद आपल्या कुटुंबियांसह मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.