
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला ना सह पतसंस्थेची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, पतसंस्थेस मार्च २०२४ अखेर ५ लाखांचा निव्वळ नफा
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेमुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे मत पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. त्या पतसंस्थेच्या सन २०२३-२४ सालच्या ९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचा आर्थिक अहवाल सादर करताना बोलत होत्या.यावेळी पतसंस्थेच्या सचिव खडकभावी शोभा बाबू , तसेच उपाध्यक्षा डॉ. धाकडे राजश्री राहुल , मसने उषा गणेश, मस्के अंजली विष्णुपंत , सविता विजय रापतवार , सरवदे संगीता विष्णू, फारोखी परवीन नुजहत , चोकडा जमुना जयप्रकाश या संचालिकांसह शाखा व्यस्थापक सागर कंगळे हे उपस्थित होते.
पतसंस्थेच्या २०२३-२४ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात अंबाजोगाई वासीयांचे आराध्यदैवत श्री योगेश्वरी देवी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक सागर कंगळे यांनी संस्थेच्या मागील वर्षाचा इतिवृत्त सादर केला. ज्यामध्ये संस्थेच्या आर्थिक वर्षातील विविध विषयांवर चर्चा घेवून त्यांना मान्यता मिळवली. तसेच मा अध्यक्षांच्या अनुमतीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
पतसंस्थेचा वार्षिक अहवाल अध्यक्षा सौ. सुनीता राजकिशोर मोदी यांनी सादर केला . आपला भारत देश हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे . यामुळे समाजात वेळोवेळी महिलांना दुय्यम स्थान देताना दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून बहुतांश महिला घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटून पडलेली आढळून येत असते. कुटुंबात तसेच दैनंदिन व्यवहारात महिलांना आर्थिक स्वायत्तता नसते. हीच बाब हेरून संस्थापक राजकिशोर मोदी व सौ सुनीता मोदी यांनी केवळ महिलांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेची निर्मिती केली. या पतसंस्थेमुळे महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वायत्तता मिळून त्यांचा व कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावल्यामुळे त्यांचे जीवनमान देखील उंचावल्याचे सुनीता मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले. पतसंस्थेच्या आर्थिक सहायाच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांचे छोटे मोठे व्यवसाय सुरु केल्याने त्यांना व त्यांच्यासोबतच इतर महिलांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अनेक महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोदी यांचे आभार व्यक्त करत आहेत.
पतसंस्थेची आर्थिक स्थिती विशद करताना त्यांनी ३१ मार्च २०२४ अखेर पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ही २३३१ एवढी असल्याचे सांगितले . तसेच संस्थेचे भागभांडवल हे रुपये २७ लाख एवढे जमा असल्याचे नमूद केले .३१ मार्च २०२४ अखेर पतसंस्थेकडे ४ कोटी ३३ लाखांच्या ठेवी जमा झाल्या असून त्यामधून समाजातील महिलांना ३ कोटी २६ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आल्याचे पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाई पिपल्स बँकेत सावित्रीमाई फुले पतसंस्थेने ०२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे . त्याच बरोबर ३१ मार्च २०२४ अखेर पतसंस्थेस ०५ लाख ३५ हजारांचा रुपयांचा नफा झाल्याचे देखील अध्यक्षा सौ. सुनीता मोदी यांनी सांगताना झालेल्या नफ्यातून पतसंस्थेच्या सर्व सभासदांना ७% लाभांश देण्याचे याप्रसंगी जाहीर केले.
पतसंस्थेच्या यशाचे सर्व श्रेय हे मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालिका, ठेवीदार ,सभासद आणि महिलांनी घेतलेल्या कर्जाचा वेळेवर परतावा यालाच द्यावे लागेल असेही सौ.मोदी म्हणाल्या. आजमितीला संस्थेत ०३ कर्मचारी तसेच ०१ नित्य निधी ठेव प्रतिनिधी असून ते देखील संस्थेच्या कामात मोलाचा वाटा उचलत असल्याचे अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेतील उपस्थित सर्व संचालिका, सभासद,व खातेदारांचे आभार उपाध्यक्षा डॉ राजश्री धाकडे यांनी व्यक्त केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचे अनेक सभासद , ग्राहक तथा हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.