
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी ‘जोशाबा’ पुरुष बचत गटाच्या वतीने साजरी
अंबाजोगाई : जातकेंद्री व्यवस्था उध्वस्त करावी आणि माणूसकेंद्री व्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य लिहिलेले आहे. अठरापगड जातींची माणसं अण्णाभाऊंना आपली वाटत होती. अण्णाभाऊंनी कष्टकऱ्यांच्या घामावर, समाजातील विषमतेवर लेखन केले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले.
‘जोशाबा’ पुरुष बचत गटाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथील विलासराव देशमुख सभागृहात दिनांक ३१ ऑगस्ट रोजी व्याख्यानाचे आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य राजकुमार मस्के (उदगीर) बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळशीराम जोगदंड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दयाराम मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमात आपल्या विस्तारीत भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. राजाराम मस्के म्हणाले की, इतिहासाचे वाचन नीट असले पाहिजे, इतिहासाचा आंधळा अभिमान, अज्ञाताचा भागामुळे स्वत:चे तर नुकसान होते पण चळवळी देखील संपल्या जातात. दुसऱ्यासाठी जगण्याचा विचार हा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात आहे. या गोष्टींकडे पाहताना आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पहावे लागणार आहे. हल्ली खूप असे झाले आहे की, ज्ञानाची प्रगती खूप झाली आहे. नेट, सेट, पीएच. डी. डॉक्टर, इंजिनिअर खूप झाले आहेत. पण माणसाची प्रगती मात्र शून्य होत चालली आहे. ज्ञानामुळे मान मिळतो हे खरे आहे, पण ज्ञानाला प्रगतीची जोड मिळाली नाही तर ज्ञान वांझोट होत हे आपण लक्षात ठेवावं, असे प्राचार्य मस्के म्हणाले.
पुढे प्राचार्य मस्के म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘फकिरा’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीला अर्पण केली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी काळजाला हलवणारी आणि आकाशात झेप घेण्यासाठी बळ देणारी कथा, कादंबरी लिहिली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी रुढीवर भंजन करणारे साहित्य लिहिले आहे. विषमतेबद्दलचा प्रशोप आणि प्रक्षोभपणा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात वाचायला मिळतो. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून विद्रोह मांडला आहे, त्याचे वाचन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सध्या इमारतींची उंची वाढली पण माणसांची उंची कमी झाल्याचे आपल्या पहायला मिळते आहे. त्या चार मजल्यांच्या इमारती काय कामाच्या ज्यात माणूसकी नाही, नातेसंबंध नाही, ओलावा नाही. म्हणून एक लक्षात ठेवा शहाणपण आले पाहिजे. अंगात महागडा कोट, हातात अंगठ्या पण जगणे जर दळभदरी असेल तर या गोष्टींचा काय उपयोग ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अण्णाभाऊ यांनी साहित्यात लिहिलेल्या पात्रांचा विचार केला तर त्यांची पात्रे कमी शिकलेली आहेत पण प्रज्ञावान, प्रबुद्ध आहेत. अस्पृश्यतेच्या नरकाला अण्णाभाऊ यांनी आग लावली आहे हे आपण विसरता कामा नये. कशासाठी लिहावं, कशावर लिहावं याचही भान अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना दिले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात लिहिले आहे. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भिमराव. या गुलामगिरीच्या चिखलातून आपल्याला सर्वांना बाहेर काढायचे आहे आणि ते गीत आता आपल्याला गात रहायचं आहे. ते गीत फक्त ओठात नव्हे पोटात उतरायचे आहे, असेही प्राचार्य मस्के म्हणाले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्राचार्य मस्के यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कांदंबरीचे आणि त्यांच्यातील पात्रांचे दाखले दिले.
यावेळी बोलताना प्रा. दयाराम मस्के म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्रिसुत्राच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा यातील पहिल्या अक्षरामुळेच आम्हाला बळ मिळाले आणि एवढ्या पदव्या हस्तगत करण्यात आल्या. ही बाबासाहेबांची किमया आणि पुण्याई आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या माणसानं जगलेली व्यथा साहित्यातून मांडली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील अनेक पात्र उलगडून सांगितली आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबद्दल उपस्थितांना सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप तुळशीराम जोगदंड यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव जोगदंड यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. संदीपान हजारे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. गादेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. रमेश सरवदे आणि बळीराम उपाडे यांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, झाड देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘जोशाबा’ पुरुष बचत गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.