
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
अंबाजोगाई शहर व ग्रामीण परिसरातील ग्रामीण भागातील शाळांमधून गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या फिरते विज्ञान प्रदर्शन या उपक्रमाचा शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी समारोप करण्यात आला. या प्रसंगी उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांचा व विज्ञान संवादकांचा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा. नागनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या पूज्य बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांचे फिरते विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम गेले महिनाभर अंबाजोगाई शहर व तालुक्यातील 45 शाळांमधे राबवण्यात आला. या उपक्रमात स्वच्छता व आरोग्याशी संबंधीत प्रदर्शनाचा परिसरातील 15000 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
दिनांक 31 ऑगस्ट शनिवार रोजी या उपक्रमाच्या समारोपाचा कार्यक्रम योगेश्वरी संस्थेच्या गो.कुं.योगेश्वरी कन्या विद्यालय येथे रोजी घेण्यात आला. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी मा नागनाथ शिंदे यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सहसचिव भीमाशंकर शेटे यांनी या उपक्रमागील संस्थेची भुमिका मांडली. पपू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन भविष्यातील विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
या उपक्रमात विज्ञान प्रयोग प्रशिक्षक म्हणून उत्साहाने काम करणारे होळेश्वर विदयालय होळ येथील विज्ञान संवादक आत्तम राठोड, संभाजीराव बडगीरे विद्यालय ममदापूर येथील श्रीमती पिनाटे मॅडम आणि योगेश्वरी संस्थेच्या विविध शाळांतील सर्व विज्ञान संवादकांचा शिक्षणाधिकारी साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गाडी सोबत पुर्णवेळ काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
मा नागनाथ शिदे यांनी मार्गदर्शन करताना योगेश्वरी संस्थेने चालवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून योगेश्वरी संस्थेच्या अशा विविध उपक्रमांसाठी प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापुरकर यांनी उपस्थित सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिनंदनपर भाषण केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, कार्यकारी उपाध्यक्ष ॲड जगदीश चौसाळकर, संचालक सदस्य रमण सोनवळकर, प्रा अभिजित लोहिया, मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, पाठक मॅडम यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर मा.शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी योगेश्वरी संस्थेच्या म फुले वस्तीगृह येथे आवर्जुन भेट दिली.