
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- केज मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना गुरुवार दि १४ रोजी विविध पक्षांच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ बब्रुवाहन पोटभरे, लोकजन शक्ती पार्टीचे राजेश व्हावळे त्याचबरोबर प्रहार संघटनेचे अशोक गंडले व फिरोज शेख यांचा समावेश आहे. आज अंबाजोगाई शहरामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सर्व पार्टी व सामाजिक संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे याना जाहीर केला. यावेळी पत्रकार परिषदेत बाबुराव पोटभरे, बब्रुवान पोटभरे, हारून इनामदार, राजकिशोर मोदी, डॉ नरेंद्र काळे, बबन लोमटे, राजेश व्हावळे, फिरोज शेख, अशोक गंडले आणी विनोद शिंदे हे उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की लोकांच्या मनाचा व त्यांच्या भावनांचा विचार व आदर करून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना बिनशर्त असा जाहीर पाठिंबा देत आहोत. केज मतदार संघात तयार झालेली एकाच कुटुंबाची मक्तेदारी , दडपशाही व हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी आपण विविध संघटनाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत उभी करत असल्याचे देखील बाबुराव पोटभरे यांनी यावेळी नमूद केले. केज मतदारसंघात एक आमदार आहेत की तीन असा प्रश्न देखील सामान्य माणसाला पडत आहे. मतदार संघातील अधिकारी , कर्मचारी हा आमदार महोदयांच्या नातेवाईकाच्या दहशतिखाली वावरताना आढळून येत असल्याची खंत व्यक्त केली .आजची निवडणूक ही कुण्या पुढाऱ्यांच्या हातात नसून ती निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली असल्याने लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठीच पृथ्वीराज साठे यांना बळ देणार असल्याचे जाहीर केले . संपूर्ण मतदार संघातील अनेक कामे ही ठराविक अशा एकाच गुतेदाराला देऊन मतदार संघाचा विकास केला नसून आपला स्वतः चा विकास साधला असल्याची खरमरीत टीका देखील बाबूराव पोटभरे यांनी यावेळी केली. मागील पाच वर्षात मतदार संघास बदनाम करण्याचे पाप विद्यमान आमदार व त्यांच्या नातेवाईक मंडळीच्या वतीने करण्यात आली असल्याचे देखील पोटभरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले. त्यामुळे जनमानसाशी नाळ जोडल्या गेलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ताकत उभी करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे सांगत मतदारांनी देखील भरघोस मतांनी पृथ्वीराज साठे यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असेही आवाहन बाबुराव पोटभरे यानी केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ बब्रुवान पोटभरे यानी देखील साठे यांना जाहीर पाठींबा व्यक्त केला. जातीवादी शक्तीला हाणून पाडण्यासाठी त्याचबरोबर एकाधिकार शाहीचा नंगानाच थोपवण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपण पाठिंबा देत असल्याचे कॉ बब्रुवान पोटभरे यांनी सांगितले. चळवळीतील संपूर्ण संघटना मिळून जनसामान्यांच्या उमेदवार पृथ्वीराज साठे यांनाच सहकार्य करणार असल्याचे हारूनभाई इनामदार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. अंबाजोगाई तसेच केज शहरातील विविध प्रकारचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी साठे यांना तमाम अंबाजोगाई शहर वासीयांच्या मदतीने मताधिक्य मिळवून देणार असल्याचे राजकिशोर मोदी यांनी नमूद केले. लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने राजेश व्हावळे यांनी देखील आपला जाहीर असा पाठींबा दिला. तर प्रहार संघटनेचे अशोक गंडले व फिरोज शेख यांनी देखील आपण पृथ्वीराज साठेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. केज मतदार संघाच्या विकासाच्या व विविध प्रश्नांची उकल असलेल्या जाहीरनाम्याचे वाचन डॉ नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी बहुजन विकास मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकजनशक्ती पार्टी, तसेच प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.