आधार मल्टीस्टेटच्या जीवनगौरव पुरस्काराने महागायक सुभाष शेप सन्मानित
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संपूर्ण मराठवाड्यात आर्थिक क्षेत्रात ज्यांचा दबदबा आहे आणि व्यवहारात ज्यांच्याकडे पारदर्शकता व प्रामाणिकपणा आहे. अशा आधार मल्टीस्टेटने सातत्याने समाजातील वेगवेगळ्या प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्वांना त्यांच्या क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल सन्मानित केले आहे. खऱ्या अर्थाने समाजाचा चांगुलपणा जपणाऱ्या काही मोजक्याच संस्था आहेत. त्यामध्ये ‘आधार’चा समावेश आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक तथा ज्यांना संगीताची कसली ही परंपरा नाही अशा महागायक सुभाष शेप यांना त्यांच्या २५ वर्षांच्या सांगितिक सेवेतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार आणि कृतज्ञता सोहळा शनिवार, दि.१६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी आधार मल्टिस्टेट ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे सांगितले. आधार मल्टीस्टेट ही संस्था मुठभर लोकांना मोठी करणारी नव्हे तर श्रमजीवी, कष्टकरी, प्रामाणिक आणि ज्यांना दिवसा उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पडते आणि तो त्यासाठी संघर्ष करतो अशा गरजू व रस्त्यावर व्यवसाय करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करते आहे. आधार मल्टीस्टेट ही केवळ व्यवसाय नाही. तर सामाजिक भान राखून काम करणारी संस्था आहे. दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अर्थ, उद्योग, सहकार, कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात ज्यांचे चांगले काम आहे अशांचा सन्मान करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करते आहे. असाच अनोखा कार्यक्रम शनिवार, दि.१६ ऑगस्ट रोजी आधार मल्टीस्टेटच्या ‘अजिंठा हॉल’ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध महागायक सुभाष शेप यांनी सांगितिक क्षेत्रात २५ वर्षे सातत्याने अखंडितपणे सेवा देण्याचे काम केले त्याबद्दल त्यांना आधार मल्टीस्टेटच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार व कृतज्ञता सोहळा’ आयोजित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक सांजपाखरूचे संपादक अशोकराव गुंजाळ, जगविख्यात पखवाज वादक उद्धवराव बापू आपेगावकर यांच्यासह आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड.सुनील सौंदरमल, संचालक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व सेवानिवृत्त प्रा.दादाराव धाकडे, ज्योतीराम (अण्णा) शेप आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड.सुनील सौंदरमल यांनी करताना संस्थेच्या वार्षिक कार्याचा आढावा घेतला. ही संस्था म्हणजे सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन काम करणारी संस्था असल्याचे सांगत १०० कोटी रूपयांच्या ठेवी जमा करण्यात यश आल्याचे सांगितले व येणाऱ्या काळात सर्व संचालक व सर्व ग्राहक सभासदांचा विश्वास संपादन करीत मोठी भरारी घेण्याचा संकल्प ऍड.सुनील सौंदरमल यांनी बोलून दाखवला. प्रास्ताविकानंतर महागायक सुभाष शेप यांना आधार मल्टीस्टेट कडून दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पद्मश्री व जगविख्यात नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप हे सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि सुभाष शेप यांना भर पेहराव तर त्यांच्या अर्धांगिनी सौ.सुनिताताई यांना साडी, चोळी असे होते. यावेळी सभागृह पूर्णतः भारावून गेले. कारण, तो सन्मान प्रत्येकाला माझाच सन्मान आहे असे चित्र त्या ठिकाणी निर्माण झाले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आधार मल्टीस्टेटच्या आधार मल्टीस्टेटचा वार्षिक अहवाल सन २०२४-२५ चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात ज्यांनी सुभाष शेप यांना संगीताचे धडे दिले असे त्यांचे गुरूवर्य पांडुरंग देशपांडे व सौ.राणीताई देशपांडे या देशपांडे दांम्पत्याचा सत्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ यांनी सुभाष शेप व त्यांचे वडील ज्योतिराम (अण्णा) शेप यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तर प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनीही मुक्तपणाने सुभाष शेप यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक उद्धवराव (बापू) आपेगावकर यांनी जेष्ठ कलावंत म्हणून काही सूचना दिल्या आणि वेळ मिळेल तेव्हा रियाज करावा व पुढे जावे, थांबू नये असा मौलिक संदेश दिला. सत्काराला उत्तर देताना महागायक सुभाष शेप यांनी अनेक आठवणी ताज्या केल्या. खडतर परिस्थितीचे चित्र उपस्थितांसमोर समोर व्यक्त केले. ज्यांनी माझे कौतुक केले ज्यांचे हात माझ्या पाठीवर सदैव राहिले. त्यामध्ये लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे आणि पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा समावेश आहे. पितृतुल्य व्यक्तिमत्त्वांकडून आपला सन्मान होत असल्याबद्दल आपणांस परमोच्च आनंद वाटत असल्याचे सांगत आठवणींचे काहूर त्यांच्या मनात दाटले व त्याला वाट मोकळी करून दिली. तर अध्यक्षीय समारोप करताना कमलाकर चौसाळकर यांनी आधार मल्टीस्टेट आणि सुभाष शेप यांच्या कार्याचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले जगविख्यात नेत्र तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी आपल्या मनोगतात आधार मल्टीस्टेट व सुभाष शेप यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले. सामाजिक भान राखून एखादी संस्था एखाद्या कलावंतांचा सन्मान करते आहे. याबद्दल आनंद वाटतो आहे. कारण, आज पुरस्कार कसे वाटले जातात ? आणि त्याचे परिणाम काय ? हे सर्वश्रुत आहे. पण, आधार मल्टीस्टेटने समाजातील वेगवेगळ्या घटकांतील माणसांना आर्थिक क्षमतेने उभे करतानाच सुभाष शेप यांच्यासारख्या किंवा इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून जो मध्य साधला आहे. तो कौतुकास्पद असल्याचे सांगत आधार मल्टीस्टेटच्या उपक्रमाचे कौतुक करीत असताना मल्टीस्टेटला एक हजार कोटी रूपयांच्या ठेवी जमा करण्यात यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या. तसेच महागायक सुभाष शेप यांच्या अनेक आठवणी डॉ.पद्मश्री तात्याराव लहाने यांनी ताज्या केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार मल्टीस्टेटचे वरिष्ठ अधिकारी अशोक डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आधार मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग ,कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी यांचे प्रयत्न महत्त्वाचे राहिले. या कार्यक्रमासाठी ओमकेश दहिफळे, एस.बी.सय्यद, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.ज्ञानोबा दराडे, प्रा.पंडित कराड, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.अशोक पत्की, अभिजीत जोंधळे, डॉ.अभिमन्यू तरकसे, डॉ.बाबुराव फड, नारायण मुंडे, प्रा.शंकर वाघमारे, भाजपाचे अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय गंभीरे, ऍड.अनिल लोमटे, जनाबाई राख, शेख रफिक, मयुरी मजगे, शेप यांचे जावाई दंतरोग तज्ज्ञ डॉ.ऋषिकेश घुले यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधार मल्टीस्टेटच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उपस्थितांकडून त्याचे स्वागत करण्यात आले.
=======================
