अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दहावीच्या निकालात जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ही उज्ज्वल यश संपादन केले आहे. गुणवत्तेसोबत संस्कार, कौशल्य आणि सर्वांगीण विकासाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई या विद्यालयाचा इयत्ता १० वीचा निकाल यावर्षी ही अत्यंत उल्लेखनीय लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करीत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९१.२० इतका असून विद्यालयातून कु.सृष्टी तुकाराम खरटमोल हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर रेणुका कैलास मंगे हिने ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच श्रावणी अमोल हारे हिने ९०.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्राविण्यसह एकूण १४ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले आहे तसेच प्रथम श्रेणी प्राप्त करणारे एकूण १७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १९ विद्यार्थी आहेत. तर १० विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९१.०४ टक्के राहीली आहे. सन २०२३-२४ चा निकाल ९० टक्के, सन २०२४-२५ चा निकाल ९७ टक्के आणि सन २०२५-२६ चा निकाल ९१.०४ टक्के आहे. जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. नियमित अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त सराव वर्ग, विषयानुसार मार्गदर्शन सत्र, क्षमता विकास चाचण्या, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम, विज्ञान व गणित क्लब, इंग्रजी संभाषण उपक्रम, वाचन संस्कार अभियान तसेच डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी खुली पुस्तक परीक्षा (ओपन बुक टेस्ट), प्रकल्पाधारित शिक्षण, वक्तृत्व, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनाही विशेष प्राधान्य दिले जाते. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, शिस्त, गुणवत्ता व संस्कार यांना विशेष महत्त्व दिले जात असून अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा विद्यालयाचा प्रयत्न असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येते. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, सौ.डिंपल मोदी, प्रा.व्ही.बी.चव्हाण, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता ५ वी ते १० वी तसेच अकरावी व बारावी विज्ञान व कला शाखेसाठी प्रवेश सुरू आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षकवर्ग, विविध कौशल्याधारित उपक्रम आणि विद्यार्थी केंद्रित वातावरणामुळे पालकांकडून विद्यालयास चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य विनायक मुंजे यांनी सांगितले आहे.
=====================
