लोखंडी सावरगाव नजीक ओमकार योग शिक्षण संस्थेची सुरूवात
अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यात योगाचे परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी ज्ञानदिप अकॅडमी लोखंडी सावरगाव अंतर्गत ओमकार योग शिक्षण संस्थेची सुरूवात बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली.
लातूर फाटा, लोखंडी सावरगाव येथे शुक्रवार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी बीड जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ज्ञानदिप अकॅडमी लोखंडी सावरगाव संचलित ओमकार योग शिक्षण संस्थेचे उद्घाटन करून स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मकुमारी सुनीता दीदी (केंद्र संचालिका, ओम शांती सेंटर अंबाजोगाई), अक्षय मुंदडा (चेअरमन, पन्नगेश्वर शुगर फॅक्टरी, पानगाव), चेतना तिडके (अपर पोलीस अधिक्षक), कॅ.पांडुरंगराव शेप (अध्यक्ष, जय जवान आजी-माजी सैनिक संस्था, अंबाजोगाई), सौ.अंजली लोहिया (मुख्याध्यापिका, जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई), संजय गंभीरे (नगरसेवक, न.प.अंबाजोगाई), परमेश्वर गित्ते (संपादक, दैनिक वार्ता समूह) हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या सहसचिव सौ.स्वप्नाली नितेश शिराळे (अध्यक्ष, आशा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य), श्रवण ऑर्केस्ट्राचे संचालक व प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर नागरगोजे, संस्थेच्या कोषाध्यक्ष योग शिक्षिका सौ.मनीषा इंगळे, माजी सैनिक परमेश्वर साठे, सौ.अंजली पाटील, योग शिक्षिका सौ.सरला उपाध्याय, योगगुरू भानुदास देशमुख, ६ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते योगगुरू सोमेंद्र शास्त्री, योगगुरू अमित वर्मा, फार्मासिस्ट व योगशिक्षक गौरव गित्ते, डॉ.मोहन मुंडे, योगगुरू सचिन थोरात, योगगुरू परमेश्वर भिसे (माजी अभियंता) आदी मान्यवर ओमकार योग शिक्षण संस्थेच्या स्थापना प्रसंगी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी उपस्थित सर्वांना योगाचे महत्व समजावून सांगितले. योगाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत बनवूया, प्रगतीपथावर घेऊन जाऊया असे आवाहन करून योग आपल्याला शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक रूपाने मजबूत बनवतो. त्यासाठी सर्वांनी योग करणे आवश्यक आहे असे आवाहन माजी खासदार डॉ.मुंडे यांनी केले. तर यावेळी बोलताना संस्थेचे सचिव योगगुरू धनंजय इंगळे यांनी सांगितले की, माजी सैनिक दत्ता लांब हे भारतीय सैन्यात फिजिकल शिक्षक होते. त्यामुळे ज्ञानदिप अकादमीतील विद्यार्थ्यांना त्यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत आहे. असे सांगून दत्ता लांब हे भारतीय सैन्यात असताना त्यावेळी त्यांनी आपली अर्धी पगार गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरलेली आहे व सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील ते समाजसेवा म्हणून आपली अर्धी पेन्शन सुद्धा अशा समाजसेवेच्या कार्यासाठी वापरतात ही कौतुकास्पद बाब आहे. २१ वर्षे देशाच्या सीमांची सुरक्षा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी २५० हून अधिक निःशुल्क योग शिबिरे आयोजित केली. ज्यामध्ये १ महिना, ३ दिवस, ७ दिवस आणि १५ दिवसांचे मोफत योग शिबीरांचा समावेश आहे. या शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्यातील तब्बल ८० हजार व्यक्तींना योगाचे मार्गदर्शन व मोफत प्रशिक्षण दिले हे खूपच प्रेरणादायी आहे असे संस्थेचे सचिव इंगळे म्हणाले. तर प्रारंभी प्रास्ताविक करताना माजी सैनिक दत्ता लांब यांनी सांगितले की, ओमकार योग शिक्षण संस्थेमध्ये महिलांसाठी ज्युडो, कराटे, कुंफू योगा, अष्टांग योग, व्यक्तिमत्व विकास व आत्मरक्षण शिबिर तसेच ३०० योग शिक्षिकांना प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावात २-२ योगशिक्षक तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेतील १-१ शिक्षकांना योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलिस व मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण योग पद्धतीने देण्यात येणार आहे. घरोघरी योग पोहोचावा व सर्वांचे शरीर, मन व आत्मा मजबूत बनावे म्हणून सर्वांच्या कल्याणाकरिता निःस्वार्थ भावनाने ही संस्था कार्य करणार आहे. महाराष्ट्राचे दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे सर्व जनतेला एकच सांगणे होते की, आपण सर्वांनी एकत्र यायचे आहे. व सर्वांनी महाराष्ट्राला शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक रूपाने मजबूत बनवायचे आहे, गरीब जनतेचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच होईल अशी त्यांची धारणा होती. आता साहेबांची ती इच्छा योगाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. कारण, योगाचा कोणताही एक वेगळा धर्म नाही. तर योग हा सर्व धर्मांतील व्यक्तींसाठी आहे. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन योग करावयाचा आहे व साहेबांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे असे मनोगत माजी सैनिक लांब यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. अकादमीचे अध्यक्ष व योग शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता दराडे यांनी सांगितले की, ज्ञानदीप अकॅडमी ही महाराष्ट्रातील नामांकित अकादमी आहे. कारण, की दरवेळेस या अकॅडमीचे सर्वांत जास्त विद्यार्थी हे मिलिटरी व पोलीस भरती मध्ये निवडले जातात. या अकॅडमीला योग प्रशिक्षक लांब यांच्यासारखे योगगुरू लाभले आहेत. ज्ञानदीप अकादमीतील सर्व विद्यार्थ्यांना योगाच्या पद्धतीने मिलिटरी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब, गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना या अकादमीचा फायदा होत आहे असे मनोगत अकादमीचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष दराडे यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन आणि दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. सर्व कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन ज्ञानदीप अकॅडमीचे संस्थापक व ओमकार योग शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता दराडे यांनी केले होते. संस्थेचे संस्थापक माजी सैनिक दत्ता लांब व संस्थेचे सचिव योगगुरू धनंजय इंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग शिक्षिका सुनिता नागरगोजे यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे आभार योग शिक्षिका प्रिया शिंदे यांनी मानले.