पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मोदी यांच्या निवासस्थानी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांची गृहभेट
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राज्यभर मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची माहिती पडताळून गणना प्रपत्र भरून घेत आहेत. या महत्त्वपूर्ण लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपली अद्ययावत माहिती बीएलओंना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष, तथा अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तथा अंबाजोगाई विकास आघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेच्या जनजागृतीचा एक भाग म्हणून उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, नायब तहसीलदार तसेच नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी श्री.देशपांडे यांनी राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबातील मतदारांची माहिती तपासण्यात आली, आवश्यक गणना प्रपत्र भरून घेण्यात आले तसेच माहितीचे पुनरीक्षण करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी सांगितले की, मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक विश्वासार्ह करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नांव मतदार यादीत समाविष्ट होणे, चुकीची अथवा अपूर्ण माहिती दुरूस्त करणे आणि मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नांवे नियमानुसार वगळणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नांव योग्य प्रकारे नोंदलेले आहे की नाही, याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने राबविलेली ही मोहीम नागरिकांच्या सोयीसाठी असून बीएलओ स्वतः घरोघरी येऊन माहिती संकलित करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसमजूत न बाळगता प्रत्येकाने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. या मोहिमेद्वारे मतदारांच्या नांवातील दुरूस्ती, पत्ता बदल, विवाहानंतर आडनावातील बदल, मृत मतदारांची नावे वगळणे, नवीन पात्र मतदारांची नोंदणी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच इतर आवश्यक बदलांची प्रक्रिया बीएलओंच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांची माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक ती माहिती अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देऊन अधिकृत ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती ऑनलाइन नोंदविणार आहेत. यासाठी मतदारांनी मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक (स्वेच्छेने), अलीकडील छायाचित्र, रहिवासी पत्त्याचा पुरावा तसेच आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि संबंधित ऑनलाइन सुविधांद्वारेही मतदारांना स्वतःची माहिती पडताळण्याची व आवश्यक बदलांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओंच्या घरोघरी भेटी व गणना प्रपत्र संकलन, २९ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे, त्यानंतर ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादी अचूक असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. प्रत्येक पात्र नागरिकाचे नांव मतदार यादीत समाविष्ट होणे आणि प्रत्येक मतदाराची माहिती अद्ययावत राहणे हीच या मोहिमेची खरी यशस्वीता ठरेल, हि मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी अंबाजोगाई विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष, गटनेते, विविध विषय समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक, सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य व मतदारांची जनजागृती करावी असे आवाहन अंबाजोगाई विकास आघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी केले.
=====================
