अंबाजोगाई (प्रतिनिधी) : उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात ‘जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती’कडून जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. एकवटलेल्या विरोधी पक्ष आणि संघटना यांनी एकत्रितपणे येवून केलेल्या कायदा विरोधी संघर्ष समितीकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम – २०२४ हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
अंबाजोगाईत जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीकडून जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे असे सांगितले. तर राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, जनसुरक्षा हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे. त्यामुळे जनतेचा सुरूवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतला आहे, असा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी करून केंद्र व राज्य सरकारचा परखड शब्दांत समाचार घेतला. आजची निदर्शने ही जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात असल्याचे कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी सांगितले. डॉ.नरेंद्र काळे यांनी ‘जनसुरक्षा कायद्याचा’ तीव्र निदर्शने करून हा कायदा लोकशाहीच्या मुल्यांची गळचेपी करणारा असून, जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा. व महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा. या दोन्ही प्रकारांवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. असे सांगितले. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आम्ही संघर्ष समितीकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देत आहोत हे नमूद केले. तर जनसुरक्षा कायदा देशांतर्गत सुरक्षेच्या नांवाखाली सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणू शकतो असे कॉ.ऍड.अजय बुरांडे म्हणाले. अमर देशमुख यांनी जनसुरक्षा या कायद्याला तीव्र विरोध दर्शवत, त्याची अंमलबजावणी थांबवावी आणि कायदा रद्द करावा, अशी मागणी केली.
ऍड.माणिक आदमाने जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त सरकार व सरकार धार्जिणे उद्योगपती यानांच होणार आहे. असे सांगितले. तर ऍड.शिवाजी कांबळे यांनी, ‘सरकारचे फक्त कौतुक करा नाही तर गप्प बसा आणि विरोधात बोलाल तर जनसुरक्षा कायद्याचा बडगा उभारून तुम्हाला गप्प करू हाच यामागचा हेतू आहे’, असा आरोप केला. ऍड.माधव जाधव यांनी हा कायदा नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे असे सांगितले. तर ऍड.इस्माईल गवळी यांनी जनसुरक्षा कायद्याची मनमानी खपवून घेणार नाही असा इशारा दिला. यावेळी अभिजीत लोमटे व शैलेश कांबळे यांनी ही या कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर यावेळी निदर्शकांना रामकिसन मस्के, असिफोद्दीन बाबा खतीब, मदनलाल परदेशी, अश्विनीताई यादव, संजिवनीताई देशमुख, उषाताई चव्हाण, अशोक पालके यांच्यासह सहभागी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी संबोधित केले. निदर्शनात माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, डॉ.नरेंद्र काळे, अमर देशमुख, कॉ.ऍड.अजय बुरांडे, रामकिसन मस्के, ऍड.माणिक आदमाने, ऍड.माधव जाधव, ऍड.शिवाजी कांबळे, असिफोद्दीन बाबा खतीब, मदनलाल परदेशी, शैलेश कांबळे, अश्विनीताई यादव, संजिवनीताई देशमुख, उषाताई चव्हाण, अशोक पालके, अभिजीत लोमटे, ऍड.इस्माईल गवळी, सिध्दू लोमटे, अंकुश ढोबळे, प्रशांत पवार, लहू शिंदे, हमीद चौधरी, सुधाकर जोगदंड, ऍड.भोसले, ऍड.विलास लोखंडे, प्रा.धुळे सर, सतिश जोगदंड, जीवन घाडगे, राजेश परदेशी, नानासाहेब ढगे, सोमनाथ धोत्रे, सालेहा शेख, जिलानी शेख, व्यंकट ढाकणे, सय्यद पाशू करीम, स्वप्निल ओव्हाळ, तानबा लांडगे, शेख अब्दुल शेख खाजा, ऍड.खान, समियोद्दीन मोमीन यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, डिपीआय, युवा आंदोलन आदींसह सरकार विरोधी राजकीय पक्ष, संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, जोरदार घोषणाबाजी करीत या कायद्याला विरोध दर्शविला.
जनसुरक्षा कायदा सामान्यांची गळचेपी करणारा – राजेसाहेब देशमुख
‘जनसुरक्षा कायदा ही दडपशाही आहे ? आज रोजी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक – २०२४ विरोधात आम्ही निदर्शने केली आहेत. हे विधेयक लोकशाही, वैचारिक स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांसाठी घातक आहे. वादग्रस्त आणि असंवैधानिक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ त्वरित मागे घ्यावे. या विधेयकाच्या नांवाखाली राजकीय विरोधक, कामगार चळवळी, विद्यार्थी चळवळी, सामाजिक कार्यकर्ते यांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न बंद करावा. विधेयकावर व्यापक जनचर्चा आणि सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी. हे विधेयक केवळ ‘जनसुरक्षा’च्या नांवाखाली लोकशाहीचा गळा आणणारे आहे. कलम २२,९,१२,१४,१५ इत्यादी कलमे मनमानी अटक, मालमत्तेची जप्ती, आणि वैचारिक मतभेदांवर कारवाईसाठी वापरली जाऊ शकतात. हे सरकारचे दडपशाहीचे हत्यार असून आम्ही अशा काळ्या कायद्याला कधीच मान्यता देणार नाही.’
अन् राजेसाहेबांनी पत्ते फेकले :
महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनासारख्या पवित्र स्थळी रम्मीचा खेळ खेळताना दिसले, ही बाब अत्यंत लाजीरवाणी व अपमानास्पद आहे. सामाजिक प्रश्नांवर उत्तरं देण्याऐवजी मंत्री असं वर्तन करतात, ही गोष्ट जनतेच्या भावनांशी खेळ करण्यासारखी आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कृषीमंत्री कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी करीत राजेसाहेब देशमुख यांनी रस्त्यावर पत्ते फेकून प्रतिकात्मक आंदोलन करून कृषीमंत्री कोकाटे व महायुती सरकारचा निषेध केला.
