अंबाजोगाईचा तरुण थेट अमेरिकन कंपनीत ऑनलाईन कार्यरत
अंबाजोगाई : गुणवत्तेच्या जोरावर जागतिक पातळीवर आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अंबाजोगाईच्या वरद सत्येंद्र बर्दापूरकर याने तब्बल एक कोटी पंचविस लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवत अभियांत्रिकी क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेतील व्हर्च्युअल लॅब्स या कंपनीने त्याच्यातील कौशल्य ओळखून हे पॅकेज जाहीर केलं असून वरद सध्या भारतातच घरबसल्या काम करतो आहे.
शालेय जीवनापासूनच स्पर्धात्मक परीक्षा व तंत्रज्ञानात गती असलेल्या वरदने एन.एम.आय.टी. जयपूर येथून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना विविध देशांमधील आणि ऑनलाईन हॅकॅथॉन स्पर्धांत भाग घेतला. त्यातून मिळालेल्या अनुभवामुळे त्याने तब्बल २० लाख रुपयांची पारितोषिकं मिळवली. आत्तापर्यंत जवळपास ६ आंतरराष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धांमध्ये वरदने बाजी मारली आहे.
हॅकॅथॉन म्हणजे काय?
तंत्रज्ञानाच्या जगतातील ही एक महत्त्वाची स्पर्धा असून, नविन प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, कोडिंग, आणि सोल्युशन्स तयार करण्याची संधी यात मिळते. हाच अनुभव आणि यश वरदच्या उज्वल भविष्याचा पाया ठरला.
वरदला यशाच्या दिशेने मार्गदर्शन मिळालं ते त्याच्या महाविद्यालयातील प्रा. मोहित गुप्ता, दक्षिण कोरियाचे गुजूस ज्यूंग, तसेच अमेरिकेचे मॅक्स यांच्याकडून. ऑनलाईन माध्यमातून हे मार्गदर्शन त्याला मिळालं. तर शालेय शिक्षण काळात अंबाजोगाईतील क्षमता वर्धन अकॅडमीचे किरण कोदरकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.
वरदने स्वित्झर्लंडमधील केशर कॅपिटल्स कंपनीत चार महिन्यांचा अनुभव घेतल्यानंतर अमेरिकेच्या व्हर्च्युअल लॅब्स या कंपनीकडून थेट सव्वा कोटींच्या पॅकेजसह नियुक्ती मिळवली. सध्या तो या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करतो आहे.
शिकताना वेळ किती खर्च केला यापेक्षा, लक्ष देऊन अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक टप्प्यावर आव्हानं स्विकारली, मेहनत घेतली, त्यातूनच यश मिळालं, असं सांगत वरद म्हणतो, “युवकांनी रिक्स घ्यावीत, जबाबदारी घ्यायला शिकावं आणि आपलं क्षेत्र ठरवून त्यात खूप मेहनत करावी.”
वरदच्या यशामध्ये त्याचे आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी कधीही बंधनं घातली नाहीत. माझ्या आवडीनुसार शिक्षणाची निवड करू दिल्यामुळेच हे शक्य झालं, असं नम्रपणे तो सांगतो.
अंबाजोगाईचा हा गुणवत्तावान तरुण आज जगाच्या नकाशावर आपली छाप पाडतो आहे, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.
