‘हम सब एक है’ चा संदेश देत विद्यार्थ्यांनी केल्या महापुरूषांच्या वेशभूषा
आई सेंटर प्रो व न्यु व्हिजन पब्लिक स्कूलचा विधायक उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून तसेच ‘हम सब एक है’ चा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध महापुरूषांच्या वेशभूषा केल्या, या सोबतच स्वातंत्र्य दिनी १५० जणांची लक्षवेधी मानवी साखळी तयार करून भारताचा नकाशा साकारला. शहरातील आई सेंटर प्रो व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने विधायक उपक्रम राबवून भारताचा ७९ वा स्वतंत्रता दिवस साजरा केला.
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रिंग रोड शेजारील मोदी लर्निंग सेंटर कॅम्पस मधील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या भव्य प्रांगणात शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताच्या ७९ व्या स्वतंत्रता दिवसानिमित्त ‘स्वातंत्र्याचा सन्मान करणे, भविष्याला प्रेरणा देणे’ ही थीम घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, पालक असे एकूण १५० जणांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. आणि सर्वांत मोठी मानवी साखळीच्या सहाय्याने भारताचा नकाशा साकारण्यात आला. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाईचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रो चे संचालक सर नागेश जोंधळे, ह.भ.प.डॉ.सय्यद रफिक पारनेरकर महाराज, राष्ट्रपती पदक विजेते सय्यद रेहमान, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, माजी प्राचार्य चंद्रकांत गायकवाड, न्यु व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य एम.प्रशांत कुमार, ज्येष्ठ पत्रकार जगन सरवदे, संपादक रणजित डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राजकिशोर (पापा) मोदी यांनी सर नागेश जोंधळे यांच्या माध्यमातून शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य होत आहे असे नमूद केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून ‘हम सब एक है’ चा संदेश आपण सर्वांनी जोपासला पाहिजे असे सांगून अंबाजोगाई हे शहर अठरा पगड जातीधर्माच्या लोकांचे शांतता, सद्भाव, संस्कृती व भारतीयत्व जोपासणारे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर आहे असे त्यांनी सांगितले. ह.भ.प.डॉ.सय्यद रफिक पारनेरकर महाराज यांनी मार्गदर्शन करताना जगात शांतता, समृद्धी, आनंद, सुसंवाद, सुसंस्कार एकत्र नांदावेत. मनुष्य जातीसह प्राणीमात्र सुखी रहावेत अशी प्रार्थना करून भारतीय स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही, समता, बंधुता या विषयावर मौलिक विचार व्यक्त केले. तर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्या भाषणातून विविध दाखले देत, शेरोशायरीतून देशप्रेमाचे स्फुल्लिंग जागविले. तर राष्ट्रपती पदक विजेते सय्यद रेहमान यांनी युवा पिढीने निर्व्यसनी रहावे, आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, देशासाठी योगदान द्यावे, आई-वडिलांची सेवा करावी असे आवाहन केले. प्रारंभी सर नागेश जोंधळे यांनी भारताच्या ७९ व्या स्वतंत्रता दिवसानिमित्त ‘स्वातंत्र्याचा सन्मान करणे, भविष्याला प्रेरणा देणे’ ही थीम नेमकी काय आहे याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी संविधान अभ्यासणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले. यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाईचे सचिव राजकिशोर (पापा) मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी व न्यु व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य एम.प्रशांत कुमार यांचे जोंधळे यांनी आभार मानले. सुरूवातीला शंकर सिनगारे यांनी त्यांच्या मधुर आवाजात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाऊन महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. हा ऐतिहासिक स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांच्या नेतृत्वात कृतिशील मुख्याध्यापिका पुनम माने (जिल्हा परिषद शाळा, वडार वाडा, चनई.) यांनी पुढाकार घेत येथील विद्यार्थ्यांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या विविध व्यक्तिमत्त्वांचा पेहरावामध्ये इयत्ता पहिलीतील तनुजा परमेश्वर अलकुंटे (कॅप्टन लक्ष्मी सेहगल), इयत्ता दुसरी वर्गातील रोहिणी राहुल गोचडे (ॲनी बेझंट), सिया नागनाथ चौगुले (क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले), निकिता परमेश्वर पेठकर (बेगम हजरत महल), समृद्धी सुहास वरवडे (मॅडम कामा), इयत्ता ५ वी वर्गातील रोहित राहुल गोचडे (क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले तसेच न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे रिया व आराध्या जोत्सना बालासाहेब कदम या चिमुकल्या बहिणींनी (अनुक्रमे इंडियन व सावित्रीमाई फुले), यश स्वाती नागेश जोंधळे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर), शिवेंद्र सुनिता रणजित डांगे (लोकनायक जयप्रकाश नारायण), सोनम कांबळे (सरोजिनी नायडू), जुळी भावंडं हुझैफ व उझैर आफरीन अलीम शेख यांनी अनुक्रमे (मौलाना अब्दुल कलाम आझाद व डॉ.राजेंद्र प्रसाद), समर्थ सुषमा श्रीराम साखरे (लाल बहादूर शास्त्री), नयन नम्रता महेश जाधव (पंडीत जवाहरलाल नेहरू) या महापुरूषांच्या आकर्षक वेशभूषेत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळची थीम ‘स्वातंत्र्याचा सन्मान करणे, भविष्याला प्रेरणा देणे’ ‘तसेच हम सब एक है, भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ चा नारा देत भारतीय संविधानाची उद्देशिका यांचे सामूहिक वाचन करून ७९ वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यु व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षिका, शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच ऍड.अलिम शेख, राजेसाहेब सरदेशमुख (मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा.श्रीपतरायवाडी), संगणक तज्ज्ञ सुनिल वाघमारे, सुमित खोत, सोमनाथ विभुते, धम्मदीप वैद्य, रोहन खंदारे, प्रेस फोटोग्राफर प्रविण चोपने आणि सर्व आई सेंटरच्या फॅमिली मेंबर्सनी परिश्रम घेतले. यापूर्वी ही शहरातील आई सेंटर प्रो चे संचालक सर नागेश जोंधळे यांच्या कल्पक दृष्टीकोनातून अंबाजोगाईकरांनी भारतीय प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध जागतिक विक्रमांना गवसणी घातली आहे हे विशेष होय.
=======================
