अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, त्यामागील गुन्हेगारी साखळी, कायदेशीर शिक्षा आणि सुरक्षित पर्यायांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय श्री.जगताप यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत, ‘अंमली पदार्थांचे व्यसन केवळ वैयक्तिक आयुष्यच उद्ध्वस्त करीत नाही, तर कुटुंब, समाज आणि भविष्यासाठ मोठा धोका ठरते असा इशारा ही त्यांनी दिला. व्यसनांमुळे होणारे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक नुकसान प्रभावीपणे मांडले जात आहेत. हे जनजागृती अभियान केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण ग्रामीण भागात पोहोचावे, अंमली पदार्थांविरोधात कठोर मानसिकता तयार व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या या अभियानाचे नागरीकांतून स्वागत होत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात ‘नशामुक्त बीड जिल्हा – आपला संकल्प, आपलं भविष्य आपल्या हाती !’ हे अभियान बीड जिल्हा पोलिस प्रमुख नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘व्यसन नष्ट करणे म्हणजे केवळ स्वतःचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे रक्षण करणे.’, अंमली पदार्थ आणि नशा आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि समाजाच्या प्रगतीसाठी घातक आहेत., व्यसनांमुळे स्वप्नं विझतात, नाती तुटतात, आणि आयुष्य अंधारात जातं., तरूणांना आणि मुलांना नशेच्या सापळ्यात अडकू देऊ नका., आपलं गांव, नशामुक्त गांव. चला, एकत्र येऊन हे शक्य करू हा विधायक संदेश घेऊन अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे काम करीत आहे. चला, नशेच्या अंधारावर प्रकाश टाकूया… नशामुक्त, निरोगी आणि प्रेरणादायी बीड जिल्हा घडवूया..! असा संकल्प बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून अभियान राबविण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच ‘पोक्सो’ या कायद्याची माहिती देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हजारे यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय श्री.जगताप, एएसआय राजेंद्र ननावरे व पोलीस जमादार प्रवीण उळे यांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील वरिष्ठ शिक्षक निळकंठ जिरगे, श्रीमती मिना अंबुरे, संतोष गायकवाड, महादेव गायकवाड आदींसह इतरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निळकंठ जिरगे यांनी केले. प्रास्ताविक संतोष गायकवाड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महादेव गायकवाड यांनी मानले.