रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई उत्तम काम करेल असा विश्वास – प्रांतपाल रो.सुधीर लातुरे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभाचे आयोजन नुकतेच शहरातील खंदारे मंगल कार्यालय, तथागत चौक, अंबाजोगाई येथे आयोजन करण्यात आले होते.
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो.भिमाशंकर न.शिंदे व सचिव रो.सुनील व्यवहारे तसेच संचालक मंडळाच्या चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभ मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रो.सुधीर लातुरे (प्रांतपाल ३१३२), रो.डॉ.गिरीश कुलकर्णी (उपप्रांतपाल) आणि रो.सुनील जोशी (क्लब एक्स्टेंशन डायरेक्टर), आनंद कर्नावट या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सौ.आरती शिंदे व सौ.संगीता व्यवहारे यांची ही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना आनंद कर्नावट यांनी सांगितले की, अंबाजोगाई ही शिक्षणाची सांस्कृतिक व शैक्षणिक सांस्कृतिक पंढरी म्हणून सर्वदूर ओळखली जाते. म्हणून अंबाजोगाई शहराकडे येणाऱ्यांचा व स्थायिक होणाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होईल, तसेच शहराची व्यापकता पाहून नवीन क्लबची संकल्पना पुढे आली असल्याचे रो.कर्नावट यांनी सांगितले. प्रारंभी स्वागतगीत बळीराम उपाडे यांनी सादर केले. तर प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. नवीन क्लबच्या अध्यक्ष व सचिवांचा परिचय रो.पुरूषोत्तम रांदड व रो.विवेक गंगणे यांनी करून दिला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चार्टर प्रदान करून पदग्रहण करण्यात आले. उपस्थित सर्वांचा परिचय व सत्कार सोहळ्यानंतर अध्यक्षीय मनोगतात भीमाशंकर शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, मागील ११ वर्षांपासून आपण रोटरीशी निगडित आहोत व शक्य होईल तेवढे प्रामाणिकपणे रोटरीचे काम करीत आहे. बालवयापासूनच अंबाजोगाईच्या विविध क्षेत्रातील घडामोडींकडे आपण काळजीपूर्वक पाहत आहोत. आपणही समाजाचे काही देणे लागतो या विधायक भूमिकेतून कार्य केले व यापुढे ही करणार आहोत. असे सांगून त्यांनी आपले रोटरी विषयीचे अनुभव कथन केले. नव्या क्लबच्या माध्यमातून यापुढील काळात ही चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील अशी ग्वाही रो.शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना दिली. तर मनोगत व्यक्त करताना रो.सुनिल जोशी यांनी या नव्या क्लबच्या माध्यमातून रोटरीची नवीन लीडरशिप व आयडिया निर्माण होणार असा विश्वास व्यक्त करून नव्या क्लबच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष रो.श्रीकांत धायगुडे यांच्यासह सर्व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तर रो.डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी रो.सुधीर लामतुरे यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ.कुलकर्णी म्हणाले की, यापूर्वी मुंबई येथे भीमाशंकर शिंदे यांनी कार्यक्रम गाजविला, यशस्वी केला. हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळे ते रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई या नव्या क्लबचे कामही अतिशय उत्तम रितीने करतील असा विश्वास डॉ.कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तर रो.सुधीर लातूरे यांनीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नव्या क्लबच्या माध्यमातून नवीन अध्यायाला सुरूवात झाली आहे. असे सांगून रो.भीमाशंकर शिंदे व रो.सुनील व्यवहारे यांना आपल्या क्षेत्राची उत्तम जाण आहे या शब्दांत त्यांनी शिंदे व व्यवहारे यांचे कौतुक केले. याच कार्यक्रमात यावर्षी गणेश उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या आरास देखावा व विसर्जन मिरवणुक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण ही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तौर, प्रा.आनंद कांबळे व जगदीश जाजू यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सचिव रो.सुनील व्यवहारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला सर्व रोटरीयन श्री.पुरूषोत्तम रांदड, जगदीश जाजू, विश्वनाथ लहाने, डॉ.दामोदर थोरात, विवेक गंगणे, ऍड.कल्याण लोमटे, मनोरमा सिरसट, नरहरी तपकिरे, श्रीकांत धायगुडे, नितीन चौधरी, ओमप्रकाश भागवत, अब्दुल काझी, सोनाली कर्नावट, श्रीनिवास पवार, भागवत कांबळे, कलीम शेख, प्रवीण बजाज, योगेश गालफाडे, सत्यम जोगदंड, सुनील कुंबेफळकर, श्रावणी साखरे आदींसह अंबाजोगाई शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विधी, वैद्यकीय, पत्रकारिता, संगीत, सहकार, व्यापार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
=======================
