शीतल मुजमुले
धुळे, वा.: जिल्ह्यातील मौजे बिलाडी येथील माजी पोलिस पाटील जगन्नाथ अहिरे यांनी सुमारे ३०-३२ वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळा केलेल्या खंडोबा बैलाचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनाची बातमी गावभर पसरली आणि अख्खं बिलाडी गाव शोकसागरात बुडाले. जो-तो खंड्याला शेवटचं पाहण्यासाठी अहिरे यांच्या घराकडे धावत होता. जणू एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झाले असे वातावरण होतं. खंडूची सर्वांनी विधिवत पूजा केली आणि पुष्पहार, फुले वाहून ट्रॅक्टरमधून गावातून अंत्ययात्रा निघाली. शेकडो गावकरी, अबालवृद्ध अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
३२ वर्षांपासून अगदी खंडूच्या जन्मापासून त्याला कधीच कुठल्या कामाला जुंपले नव्हते. माझा पहिलवान खंडू म्हणून जगन्नाथ अहिरे यांनी त्याला लाडात वाढवले होते. सर्वत्र चाऱ्याची टंचाई जाणवत असतानाही खंडोबाला हिरवा चारा मिळत असे. अनेक शेतकरी बैलांकडून निर्दयपणे मेहनत करून घेऊन त्यांना मारहाण करतात, पण खंडोबाला कधी कुठे जुंपलेच नाही. तो मुका बैल नसून माझा मुलगा आहे, असं समजून अहिरे यांनी प्रेम लावले.
अन् गावकऱ्यांचेही डोळे डबडबले
लाडका बैल खंडोबाच्या निधनाची वार्ता मालक जगन्नाथ अहिरे यांच्या कानावर पडताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना हंबरडा फोडताना पाहून अंत्ययात्रेत सहभागी गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. प्रत्येकाचे डोळे डबडबले होते. अत्यंत भावूक वातावरणात शेकडो नागरिकांनी खंडोबाला अखेरचा निरोप दिला.
शेताचे करी रक्षण
खंडू मालक जगन्नाथ अहिरे आणि मालकीन पार्वता अहिरे यांच्याशिवाय कुणालाही जवळ येऊ द्यायचा नाही. एवढेच नव्हे तर तो चारापाणीही त्यांच्याच हातून खायचा. त्यामुळे त्यांना कुठे बाहेरगावी जायचे असेल तर आधी खंडोबाची व्यवस्था करावी लागत असे. त्याला शेतात बांधावर बांधले की अख्ख्या शेतात कुणी येण्याची हिंमत करत नसे. तो शेताचा रक्षकच होता.
दहाव्याचे गावभर आमंत्रण
लाडक्या खंडोबा बैलाचे दहावे करण्यात येणार असून त्यासाठी गावात सर्वांना आमंत्रण देण्यात येणार असल्याचे मालक अहिरे यांनी सांगितले.
