अंबाजोगाई:- योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक या विभागामध्ये मंगळवार,दि. १२ ऑगस्ट रोजी प्रथम वर्षात नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व त्याचबरोबर पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. चंद्रशेखर बर्दापूरकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ मा. महेश पाटील,सचिव श्री.कमलाकरराव चौसाळकर व प्रसिद्ध उद्योजक प्रताप पवार हे उपस्थित होते.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी पॉलिटेक्निक या विभागाच्या स्थापनेला शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थी जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने तयार व्हावीत या उद्देशाने सुरू केलेल्या या विभागातून आजपर्यंत हजारो अभियंते घडले असून, यामध्ये पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी शासकीय अधिकारी, प्रसिद्ध उद्योजक, व उद्योग समूहांमध्ये कुशल अभियंते म्हणून कार्यरत आहेत. योगेश्वरी शिक्षण संस्थेची उज्वल परंपरा योगेश्वरी पॉलिटेक्निक चालवत असून, अल्पावधीतच या विभागाने महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तंत्रनिकेतनच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी पॉलिटेक्निकमधील सोयीसुविधा, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, व्यक्तिमत्त्व विकास, संगणकीय सुविधा विविध अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच्या करिअर संधी, यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद या मुद्द्यांबाबत माहिती दिली. यानंतर प्रमुख पाहुणे मा. महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना, योगेश्वरी शिक्षण संस्था ही तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असा संदेश दिला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करत असताना चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत योगेश्वरी शिक्षण संस्थेतर्फे करण्यात येणार असून, भविष्यात देखील गुणवंत विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणात संस्थेचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्याचबरोबर उन्हाळी परीक्षा -2025 मध्ये प्रथम वर्षातील 20 विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रवेश प्रक्रिया प्रमुख तसेच प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा.नारायण सिरसाट यांना या उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्कारित व सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थांना मार्गदर्शन करून,तंत्रनिकेतनचा नावलौकिक वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे विभाग प्रमुख प्रा.रोहित कदम, प्रा. शाम गडदे,प्रा. बप्पासाहेब सोनवणे यांना याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने चि.अभिषेक बिराजदार व चि ज्ञानेश्वर भांगे यांनी तंत्रनिकेतनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.प्रियांका गंभीरे व आभार प्रा. शाम गडदे यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विदयार्थी व पालक उपस्थित होते.
